ठाणे- शस्त्रक्रिया झालेल्या कॅन्सरग्रस्त रुग्णाला घरी सोडण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. त्यामुळे, रुग्णाच्या मुलाने आपल्या पित्याला व आईला दुचाकीवर बसवून जीवघेणा प्रवास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या वेळी प्रवास मार्गावर ठिकठिकाणी पोलिसांची नाकेबंदी होती. मात्र, रुग्णाच्या नाकात नळी लावलेली दिसल्यावर पोलिसांनी त्यांना जाऊ दिले.
भिवंडी शहरातील पद्मानगर परिसरात राहणारे वीरस्वामी कोंडा याना तोंडाचा कर्करोग आहे. त्यामुळे, त्यांच्या पत्नी लक्ष्मी यांनी त्यांच्यावर उपचार करण्यासाठी खासगी डॉक्टरांचा सल्ला घेतला व नंतर पतीला मुंबईतील टाटा कर्करोग रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी शस्त्रक्रिया करण्यासाठी २० हजार रुपये जमाही केले. परंतु, तीन महिन्यानंतर रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यासाठी दोन महिने थांबावे लागेल, असे सांगत टाटा रुग्णालयाने खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्याचे सुचवित त्यासाठी मुलुंड येथील आशीर्वाद रुग्णालायाचे नाव सुचविले.
आशीर्वाद रुग्णालयात लाखो रुपये खर्च करून लक्ष्मी कोंडा यांनी आपल्या पतीची शस्त्रक्रिया केली. मात्र, त्यानंतर कोंडा दांपत्याची परवड सुरू झाली. शस्त्रक्रिया झाल्यावर डॉक्टरांनी विरस्वामी कोंडा यांना १२ दिवसात घरी जाण्याचे सूचविले. त्यादरम्यान करोना विषाणूमुळे संपूर्ण राज्यात लॉकडाऊन करण्यात आले. याच वेळी डॉक्टरांनी विरस्वामी कोंडा यांना रुग्णालयातून सुट्टी दिली. विशेष म्हणजे, रुग्णाच्या नाकातील जेवण देण्याची नळी बदलणे, इतर ट्रिटमेंट करण्यासाठी पुन्हा भिवंडीवरून येणे जमणार नसल्याने लक्ष्मी कोंडा यांनी मुलुंड परिसरातील गुरुद्वाऱ्यात जाऊन राहण्याचा निर्णय घेतला. परंतु, ८ दिवस झाल्यानंतर गुरुद्वारा व्यवस्थापकांनी कोंडा यांच्याकडे घरी जाण्याबाबत तगादा लावला.