ठाणे - उल्हासनगर महापालिकेच्या अतिक्रमण पथकाकडून मासळी व मटण मार्केटमधील अतिक्रमणावर धडक कारवाईला आज (दि. 15 ऑक्टोबर) सुरुवात करण्यात आली होती. मात्र, महापालिकेने कोणतीही नोटीस न देता ही कारवाई सुरू केल्याचा आरोप करत एका मटण विक्रेत्याने मटण कापण्याचा सुराच स्वतःच्या गळ्यावर ठेऊन अतिक्रमण कारवाईला विरोध केल्याने मटण-मासळी बाजारात गोंधळ उडाला होता.
उल्हासनगर कॅम्प नंबर 5 च्या मठमंदिर भागात अतिक्रमण करून मासळी व मटण विक्रीची काही दुकाने थाटण्यात आल्याने रहदारी अडथळा होत असल्याच्या तक्रारी महापालिका अतिक्रमण विभागाकडे आल्या होत्या. या तक्रारीची दखल घेत आज (गुरुवार) महापालिकेचे अतिक्रमण पथक जेसीबी घेऊन कारवाईसाठी या मासळी व मटण मार्केटमध्ये गेले होते. त्यावेळी एका मटण-मासळी विक्रेत्याने पोलीस आणि पालिका अधिकारी यांच्याशी बाचाबाची होताच धावत जाऊन दुकानातील मटण कापण्याचा सुरा घेतला आणि आपल्या गळ्यावर ठेवला. हा गोंधळ 20 ते 30 मिनिटे सुरू होता. त्यामुळे परिसरात वातावरणात तापले होते.