ठाणे - वडिलांसह मुलीने राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या ( Man Committed Suicide with His Daughter ) केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शहापूर तालुक्यातील आसनगाव घडली आहे. खळबळजनक बाब म्हणजे वडिलांनी आत्महत्या करण्यापूर्वी दोन पानी सुसाइड नोटमध्ये ( Suicide Note ) एका पोलीस अधिकाऱ्याचे नाव नमूद केल्याने ग्रामीण पोलीस दलात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. विकास केदारे (वय 36 वर्षे) आणि मुलगी आर्या केदारे (वय 11 वर्षे), असे आत्महत्या करणाऱ्या बाप लेकीचे नाव आहे.
पत्नीच्या आत्महत्याप्रकरणी कारागृहात -मृत विकास केदारे हे कुटुंबासह शहापूर तालुक्यातील आसनगाव परिसरात राहत होते. त्यातच 15 ऑगस्ट, 2021 रोजी मृत विकासची पत्नी मोनालीने घरातच कीटकनाशक औषध प्राशनकरून आत्महत्या केली होती. त्यावेळी पोलिसांनी पत्नीच्या आत्महत्येला पती विकास कारणीभूत असल्याचा ठपका ठेवून विकास व त्याची वयोवृद्ध आई या दोघांना मोनालीच्या आत्महत्येच्या आरोपाखाली अटक केली होती. त्यानंतर तपास अधिकाऱ्याने दोघांना न्यायालयात हजर केले असता मृत विकास व त्यांची वयोवृद्ध आईला कारागृहाची शिक्षा सुनावली होती. त्यातच जानेवारी महिन्यता विकास कारागृहातून बाहेर आला होता. त्यानंतर आत्महत्यापूर्वी सुसाइड नोटमध्ये आपण काही गुन्हा केला नसतानाही माझ्यावर खोटा आरोप करून पोलीस अधिकाऱ्याने मला खूप त्रास दिला. त्यामुळे आत्महत्या करीत असल्याचे सुसाइड नोटमध्ये ( Suicide Note ) नमूद करून मंगळवारी (दि. 15 मार्च) बाप-लेकीने घरातच गळफास लावून जीवन यात्रा संपवली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनस्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात रवाना केले होते.