ठाणे - शेतकऱ्यांना मदत करायचे बंद कर, लय शेतकऱ्यांचा पुळका आहे काय, असे म्हणत एका पत्रकाराला अज्ञात दुचाकीस्वारांकडून धमकावण्यात आल्याचा प्रकार समोर आले आहे. उमेश जाधव असे पत्रकाराचे नाव असून त्यांनी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वारांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, बुधवारी रात्री साडे नऊ ते दहाच्या सुमारास पत्रकार उमेश जाधव हे रायते येथून आपल्या गाडीने घरी जात होते. याचवेळी गोवेली टिटवाळा मार्गावर अनखरपाडा मोरवी लगत दोन दुचाकीस्वरांनी जवळ येऊन त्यांना धमकावले. शेतकऱ्यांना मदत करायचे बंद करा, लय शेतकऱ्यांचा पुळका आहे काय, खूप झाल तुमच, थांबवा हे सगळं! आता फक्त समजावतो आहे यापुढे समजावणार नाही, असे बोलून दुचाकीस्वार निघून गेले. त्यांचे तोंड कपड्यानी बांधलेले होते. तसेच आंधार असल्यामुळे दुचाकीचा नंबर घेता आला नाही, असे जाधव यांनी सांगितले.