महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धावत्या लोकलमधून पडून तरुणी गंभीर जखमी; नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव - विठ्ठलवाडी रेल्वेस्थानक

विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या एफ कॅबीनजवळ धावत्या लोकलमधून पडून एक तरुणी गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली. विशेष म्हणजे नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्या तरुणीचा जीव वाचला असून तिच्यावर ठाण्यातील कळवा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

thane
धावत्या लोकलमधून पडून तरुणी गंभीर जखमी

By

Published : Dec 18, 2019, 12:05 PM IST

ठाणे - कल्याणहून अंबरनाथच्या दिशेने जाणाऱ्या धावत्या लोकलमधून पडून एक तरुणी गंभीररित्या जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्या तरुणीचा जीव वाचला असून तिच्यावर ठाण्यातील कळवा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर तरुणी गंभीर जखमी असल्याने तिचे नाव व पत्ता पोलिसांना समजू शकले नाही. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी तपास सुरू करून त्या तरुणीच्या नातेवाईकांचा शोध सुरू केला आहे.

धावत्या लोकलमधून पडून तरुणी गंभीर जखमी

विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या एफ कॅबीनजवळ मंगळवारी रात्री साडे ९ च्या सुमारास एक तरुणी अंबरनाथ लोकलमधून पडली. तीची आपल्या जीवासाठीची धडपड सुरू असताना याच परिसरात राहणारे दिनेश धुमाळ, विशाल रोकडे यांना दिसले. त्यांनी तातडीने या तरुणीला उपचारासाठी नेण्याचा प्रयत्न केला. मात्र विठ्ठलवाडी स्थानकाजवळ रुग्णवाहिका, व्हिलचेअर तसेच रेल्वे अधिकारी, लोहमार्ग पोलीस कोणीच दिसून आले नाही. दरम्यान, दुसरी लोकल जात असताना त्यामधून एका महिलेने स्वःताजवळील ओढणी फेकली. त्याच ओढणीमध्ये या जखमी तरुणीला दिनेश व विशाल यांनी इतर नागरिकांच्या मदतीने उचलून पोलिसांच्या मदतीने कल्याणच्या रुक्मिनीबाई रुग्णालयात उपचाराकरता दाखल केले. मात्र, तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला पुढील उपचारासाठी कळव्यातील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.

हेही वाचा - कचऱ्याच्या डंपरचे ब्रेक फेल होवून झालेल्या अपघातात २ मजूर ठार तर सहाजण गंभीर जखमी

दरम्यान, तरुणीचा जीव वाचविणाऱ्या तरुणांनी विठ्ठलवाडी स्थानकावरील रेल्वे प्रशासनाचा निषेध करीत पोस्ट व्हायरल केली. त्या तरुणांनी विठ्ठलवाडी रेल्वे टिकीट घराचे व स्थानक परिसराचे १० वाजून २ मिनीटांनी काढलेल्या फोटो व व्हिडिओमध्ये कोणीही अधिकारी, पोलीस येथे उपस्थित नसल्याचे दिसत आहे. शिवाय रुग्णवाहिका, व्हीलचेयर, हमाल कोणीही उपस्थित नव्हते.

रेल्वे स्थानकाच्या चारही बाजुला लोखंडी बँरींगगेट मारून बंद करुन ठेवल्यामुळे त्या जखमी मुलीला रुग्णालयात नेण्याकरता सदर तरुणांना बरीच धावपळ करावी लागली. दरम्यान, शिवसेना विठ्ठलवाडी विभागीय शाखेचे पदाधिकारी यांनी त्या मुलीला ताबडतोब विठ्ठलवाडी रिक्षा स्टँड प्रमुख यांच्या रिक्षात टाकुन ताबडतोब रुक्मिनीबाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर, पुढील उपचारासाठी त्या मुलीला रुक्मिनीबाई रुग्णालयातून कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

या घटनेप्रकरणी तरुणांनी विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकातील सर्व अधिकाऱ्यांचा निषेध करत असल्याची पोस्ट व्हायरल करून संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचा - नवी मुंबई : वाशीमधून ८९ किलो गांजा हस्तगत, एकास ताब्यात

ABOUT THE AUTHOR

...view details