ठाणे - डोंबिवली नजीकच्या कोळेगाव परिसरातीळ एका खदानीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या आई आणि लहान बहिणीला पाण्यात बुडताना पाहून 16 वर्षीय मोठ्या मुलीने दोघांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. धक्कादायक बाब म्हणजे या दोघींनी वाचवण्यासाठी तीने पाण्यात उडी घेतली. तर या घटनेत आई आणि लहान मुलीला वाचवण्यात यश आले असून मोठी मुलगी पाण्यात बुडून बेपत्ता झाल्याचे सांगण्यात येत आहे. लावण्या शेट्टी (वय 16 वर्षे) असे पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर आई गीता शेट्टी आणि मुली परी (वय 4 वर्षे) असे बचावलेल्या माय-लेकींची नावे आहेत.
लहान‘परी’चा पाण्यात घसरला पाय आणि घडली दुर्घटना
मानपाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आई गीता आपल्या दोन मुलींसह कपडे धुण्यासाठी रविवारी (दि. 27 डिसें.) दुपारच्या सुमारास कोळेगाव परिसरात असलेल्या खदानीत गेली होती. त्यावेळी खेळता-खेळता लहान मुलगी परीचा पाय घसरला आणि ती पाण्यात पडली. अशात आपल्या लेकीला वाचवण्यासाठी पोहता येत नसतानाही आई गीता हिने पाण्यात उडी घेतली. परी आणि गीता दोघींना पाण्यात पोहता येत नसल्याने लावण्या घाबरली आणि तिने त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. लावण्याने मोठ्या हुशारीने आई आणि परीचा जीव वाचवला. पण, दुर्देवाने ती पाण्याच्या प्रवाहात अडकल्याची माहिती देण्यात आली आहे.