ठाणे- भिवंडी शहरालगतच्या अंजूरफाटा चरणीपाडा येथील झाडाझुडुपात एक महिन्याचे स्री जातीचे जिवंत अर्भक सापडले. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
भिवंडी शहरालगतच्या चरणीपाडा येथील रमीबाई जीवा रायात ही आदिवासी महिला सकाळी शांती वेअर हाऊसलगतच्या मोकळ्या जागेत आपल्या बकऱ्या चारण्यासाठी घेऊन गेली होती. त्यावेळी तेथील झाडाझुडुपात गवतावर एक महिन्याचे स्री जातीचे बाळ रडत असताना बेवारस स्थितीत तिला दिसले. त्यामुळे तिने याबाबतची माहिती परिसरातील नागरिकांना दिली. त्यानंतर याबाबत नारपोली पोलिसांना कळवण्यात आले. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक जी.बी.गणेशकर यांनी पोलीस पथकासह धाव घेऊन बाळाला घेऊन उपचारासाठी प्रथम स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय उपचारानंतर बाळाला पुढील देखभालीसाठी डोंबिवलीच्या जननी आशिष बाल सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.