ठाणे- मुबंईतील एका बांधकाम व्यावसायिकाला नोटा बदलून देत १५ टक्क्यांचे आमिष दाखवून ६ लाखांचा गंडा घालणाऱ्या टोळीचा निजामपुरा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. शाहनवाज अब्दुल सत्तार शहा (वय ५१) असे फसवणूक झालेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांच्या फिर्यादीवरून निजामपुरा पोलीस ठाण्यात अज्ञात टोळी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशेष म्हणजे, केवळ मोबाईल लोकेशन व तांत्रिक बाबीच्या आधारे पोलिसांनी या टोळीला गजाआड केले आहे.
राम दिगंबर गारोले उर्फ अजय, (वय २९ रा. खोका कंपाऊंड, भिवंडी ) शरीफ अब्दुल अजीम शेख, (वय ३० रा.मौलाना आझाद नगर, भिवंडी ) मोहम्मद नबीलाल उर्फ सिकंदर फकीर शेख, (वय २८ व रा. घुंगट नगर, भिवंडी) अनिल सोहनलाल गुप्ता उर्फ राजेश बन्सीलाल मिश्रा उर्फ शिवा, (वय ३८ वर्ष, रा. भादवड नाका, भिवंडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, टोळीतील २ आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील अंधेरी परिसरात राहणारे बांधकाम व्यावसायिक शाहनवाज यांना टोळीतील एका आरोपीने संर्पक करून ५००, २ हजार रुपयांच्या नोटांच्या बदल्यात १०० रुपयांच्या नोटा, त्यात १५ टक्के कमिशनचे आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला होता. त्यामुळे, फिर्यादीने ५०० व २ हजार रुपयेयुक्त ६ लाख रुपये भिवंडी येथे आणले. येथे आरोपी राम दिगंबर गारोले उर्फ अजय उर्फ संदीप, शरीफ अब्दुल अजीम शेख, मोहम्मद नबीलाल उर्फ सिकंदर फकीर शेख, अनिल सोहनलाल गुप्ता उर्फ राजेश बन्सीलाल मिश्रा उर्फ शिवा, या भामट्यांच्या टोळीने त्यांच्या दोन बनावट पोलीस साथीदारांच्या मदतीने रोकड व्यवहारात लबाडी केली, तसेच फिर्यादीची रक्कम घेऊन पोबारा केला.