ठाणे- पैशाच्या वादातून मित्राने आपल्याच मित्राची धारदार कोयत्याने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना उल्हानसागर शहरातील कॅम्प ३ च्या ओटी सेक्शन परिसरातील एका घरात घडली आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, मित्राची कोयत्याने गळा चिरल्यानंतर आरोपी मित्र स्वतः पोलीस ठाण्यात हजर होताच त्याला पोलिसांनी अटक केली आहे. सागर वासवानी असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर, किसन स्वामी असे अटक केलेल्या आरोपी मित्राचे नाव आहे. सागर आणि किसन स्वामी हे दोघेही मित्र उल्हासनगर कॅम्प ३ च्या ओटी सेक्शन भागात राहतात. शुक्रवारी रात्री २ च्या सुमारास दोघांनी आरोपी किसनच्या घरी बसून दारू पिली. यावेळी सागरने किसनकडून घेतलेल्या पैशाच्या विषयावरून दोघांमध्ये वाद झाला. दरम्यान, दारूच्या नशेत असलेल्या सागरच्या डोक्यात प्रहार करून किसनने त्याचा धारदार कोयत्याने गळा चिरला. त्यामुळे, घरात सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता.