ठाणे : मद्यापायी मेकॅनिक, रिक्षाचालक दोघे मिळून रिक्षा, मोटारसायकल चोरत असल्याची घटना समोर आली आहे. मात्र, सीसीटीव्हीच्या मदतीने या दोन्ही चोरट्यांची ओळख पटवून त्यांना पिसवली गावातून जेरबंद करण्यात रामनगर पोलिसांना यश आले आहे. श्रीकांत शेडगे (वय, 49, रा. पिसवली, डोंबिवली पूर्व), विक्रम साळुंखे (43, रा. विठ्ठलवाडी, उल्हासनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक करण्यात आलेला चोर श्रीकांत हा मेकॅनिक असुन विक्रम हा रिक्षाचालक आहे.
डोंबिवलीत चोरांचा धुमाकूळ :कल्याण डोंबिवलीत चोरांनी धुमाकूळ घातला आहे. 21 एप्रिल रोजी डोंबिवली पूर्वेकडील ठाकुर्ली चोळेगाव परिसरात रिक्षा चोरीला गेली होती. याप्रकरणी डोंबिवलीतील रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी घटनेच्या आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने या गुन्ह्याचा तपास सुरू केला. एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन चोरटे ही रिक्षा चोरतांना पोलिसांना दिसले. यासाठी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला. कल्याण पूर्वेतील पिसवली परिसरात दोन्ही चोरटे चोरीच्या रिक्षांचे ऑटो पार्ट्स विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार रामनगर गुन्हे अन्वेषण शाखेचे सपोनि योगेश सानप, हवालदार नीलेश पाटील, प्रशांत सरनाईक, इतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन दोन्ही चोरट्यांना अटक केली.