ठाणे : गुजरातमधील अहमदाबाद शहरात कोविड रुग्णालयाला लागलेल्या भीषण आगी पाठोपाठ आंध्र प्रदेशमधील विजयवाडा शहरातही कोविड रुग्णालयाला भीषण आग लागून अनेक रुग्ण होरपळून मृत्युमुखी पडले. त्यातच कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतही डोंबिवलीत 2 तर कल्याण येथे 2 ठिकाणी नव्याने मोकळ्या जागेत कोविड रुग्णालय उभारले जात आहे. मात्र, विविध ठिकाणच्या आधीच्या आगीच्या घटनेने सतर्क होऊन त्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनातर्फे या रुग्णालयात फायर सिस्टीम बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
परराज्यातील कोविड रुग्णालयात लागलेल्या आगीच्या घटनेने केडीएमसी सतर्क कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे गेल्याच महिन्यात डोंबिवलीतील सावळाराम क्रीडा संकुलमधील कै. सुरेंद्र वाजपेयी बंदीस्त क्रीडा गृहात अत्याधुनिक कोविड रुग्णालय सुरू करून त्यामध्ये 155 ऑक्सिजन खाटा, 30 आयसीयू, 10 व्हेंटिलेटर खाटांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या ठिकाणी फायर सिस्टीमची आधीपासूनच व्यवस्था असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या बंदिस्त रुग्णालयाबाहेर मैदानाच्या मोकळ्या जागेवर सुमारे 87 खाटांचे कोविड रुग्णालय उभारण्याचे काम सुरू असून येत्या 10 ते 15 दिवसात या रुग्णालयाचे सर्वसुविधा व फायर सिस्टमसह लोकार्पण करण्यात येणार आहे.
तर, डोंबिवली पूर्वेतील डोंबिवली जिमखान्याच्या मोकळ्या मैदानात अत्याधुनिक असे कोविड रुग्णालय उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या रुग्णालयात 70 आयसीयु खाटा असणार आहेत, ऑक्सिजन सुविधा असलेल्या 32 आणि डायलेसिस रुग्णांसाठी 3 खाटा अशा 121 खाटा येथे उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आहे. या ठिकाणी आगीची दक्षता घेऊन उपाययोजना केल्याचे येथील सुपरवायझर मंगेश यांनी सांगितले. विशेष म्हणजे ऊन, वारा, पावसापासून सुरक्षाव्यवस्था दोन्ही रुग्णालयात उभारण्यात येत असल्याचे दिसून आले. तर, दोन्ही रुग्णालयाच्या अर्ध्या किलोमीटर अंतरावरच एमआयडीसी आणि महापालिकेच्या अग्निशमन दलाचे केंद्रदेखील आहे.
कल्याणमधील गोविंदवाडी परिसरात 55 खाटांचे कोविड केयर सेंटर आसरा फाऊंडेशन आणि महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या शाळेतच उभारण्यात आले आहे. तर कल्याणच्या लाल चौकी परिसरातील बंदिस्त आर्ट गॅलरीमध्येही 300 खाटांचे अत्याधुनिक कोविड रुग्णालय उभारण्याचे काम सुरू असून या ठिकाणी आगीच्या घटनेची दक्षता घेऊनच काम सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान सध्याच्या परिस्थितीत महापालिका हद्दीत सुमारे 700 खाटा रुग्णांसाठी उपलब्ध असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले आहे. तर, येत्या काही दिवसातच आणखी 500 खाटांची सुविधा रुग्णांना उपलब्ध होणार असून याठिकाणी रुग्णांना योग्य ती सुविधा व सुरक्षा देण्याचा मानस वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. तर, महापालिका प्रशासनाने सर्वात आधी डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालय हे कोविड सेंटर म्हणून जाहीर करून रुग्णांवर उपचार करीत आहे. तसेच कल्याण भिवंडी रोडवरील टाटा आमंत्रा येथील 23 मजल्याच्या इमारतीमध्ये कोविड केयर सेंटर उभारून सुमारे 2 हजार 400 खाटा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या ठिकाणी आधीपासूनच फायर सिस्टीम असल्याचे सांगण्यात आले आहे. शिवाय 24 तास अग्निशमन दलाची गाडीही ठेवण्यात आली आहे.
दरम्यान कल्याण डोंबिवली अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी पालिका हद्दीतील 25 खासगी कोविड रुग्णालयात असलेल्या अग्निशमन प्रतिबंधक उपाययोजनेची रुग्णालय सुरू होताना पाहणी केली असल्याचे अग्निशमन विभागाच्या कार्यलयातून सांगण्यात आले. तर, नव्याने सुरू होणाऱ्या कोविड रुग्णालय व केयर सेंटरच्या ठिकाणीही पाहणी करून अग्निशमन प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे डोंबिवली विभागाचे अग्निशमन दलाचे अधिकारी राजा गोवारी सांगितले. मात्र, त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला. तर कल्याण डोंबिवली महापालिका अग्निशमन दलाचे प्रमुख दिपील गुंड यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी नव्याने मोकळ्या जागेत उभारलेल्या कोविड रुग्णालयाबाबत अग्निशमन दलाच्या नियमानुसार येथे व्यवस्था करण्यात आली असल्याचे त्यांनी 'ई टीव्ही भारत 'शी बोलताना सांगितले.