महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

फेसबुकवरील अमेरिकन मैत्रिणीने साप्ताहिकाच्या संपादकाला घातला गंडा - भिवंडी साप्ताहिक संपादक फेसबूक फसवणूक

सोशल मीडियाच्या माध्यमातून जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील व्यक्तीशी आपण संपर्क करू शकतो. यातून सांस्कृतीक, शैक्षणिक आणि वैचारिक देवाण-घेवाणही होते. मात्र, याचे कधी-कधी दुष्परिणामही समोर येतात. भिवंडीतील एका साप्ताहिकाच्या संपादकाला फेसबुकवरील मैत्री महागात पडली आहे.

Rose Andrea
आरोपी रोज अँड्रीया

By

Published : Nov 27, 2020, 4:36 PM IST

Updated : Nov 27, 2020, 5:27 PM IST

ठाणे -एका संपादकाला फेसबुकवरील अमेरिकन तरुणीशी मैत्री चांगलीच महागात पडली आहे. ही घटना भिवंडी शहरातील कामतघर-चंदनबाग परिसरात राहणाऱ्या एका साप्ताहिकाच्या संपादकासोबत घडली. संतोष चव्हाण (वय ४२) असे फसवणूक झालेल्या संपादकाचे नाव आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात अमेरिकन मैत्रिणीसह तिच्या साथीदारावर फसवणुकिचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोज अँड्रीया असे गुन्हा दाखल झालेल्या अमेरिकन तरुणीचे नाव आहे. दाखल गुन्ह्याच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

चार वर्षापासून होती फेसबुकवर मैत्री -

भिवंडी शहरातून प्रसिद्ध होणाऱ्या एका साप्ताहिकाचे संतोष चव्हाण हे संपादक आहेत. चार वर्षांपूर्वी अमेरिकेत राहणारी आरोपी रोज अँड्रीया हिच्या सोबत फेसबुकवरून संतोष यांची मैत्री झाली होती. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांपूर्वी संतोष यांनी काही कारणावरून अचानक तिचे फेसबुक अकाऊंट ब्लॉक केले होते. त्यामुळे दोघांचा संपर्क तुटला होता. मात्र, काही महिन्यांपूर्वी आरोपी अँड्रीयाने संतोषशी गोड-गोड बोलून फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून पुन्हा मैत्री केली.

रोज अँड्रीयाने संतोष यांना पाठवलेला फोटो

पुन्हा मैत्रीचा सिलसिला सुरू अन् -

फेसबुकवरच पुन्हा दोघांमध्ये मैत्रीचा सिलसिला सुरू झाला. एक दिवस आरोपीने 'मी तुझ्यासाठी अमेरिकेतून काही वस्तू पाठवल्या आहेत', असा संतोषच्या फेसबुकवर मेसेज पाठवला. त्यानंतर २ जुलै ते ७ जुलै २०२० या कालावधीत दोघांमध्ये फेसबुकवरच या विषयी चर्चा झाली. यात एक महागडे घड्याळ, एक मोबाईल, बूट आणि इतरही वस्तू पाठवल्याचे सांगत, या वस्तूंचे फोटो फेसबुकवर शेअरही केले. यासर्व वस्तू दिल्ली कस्टम ऑफिसमध्ये रक्कम भरून सोडवून घ्याव्यात असेही तिने संतोषला सांगितले. मात्र, हे सोडवण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत, असे संतोषने तिला सांगितले. आपण अमेरिकन डॉलरही वस्तूंसोबत पाठवल्याची आरोपीने संतोषला थाप मारली. यामुळे तिच्या बोलण्यावर संतोषचा विश्वास बसला. त्यांनी दिल्लीच्या कस्टम ऑफिसमध्ये ३७ हजार ५५० रुपये कस्टम ड्युटी भरण्याची तयारी केली. त्यानंतर आरोपीने संतोष यांना दिल्ली कस्टम ऑफिसचा मोबाईल नंबर आणि एक बँक खाते नंबर दिला. त्यानुसार संतोष यांनी त्या मोबाईलवर संपर्क साधून तुम्ही माझ्या नावाचे पार्सल मुंबई कस्टम ऑफिसमध्ये पाठवा. मी येथूनच सोडवून घेईल, असे सांगितले. मात्र, त्या अनोखळी मोबाइलधारकाने तुम्हाला दिल्लीतील बँक खात्यावरच रक्कम वर्ग करावी लागले, असे सांगितले. त्यानंतर भिवंडीतील संतोष यांच्या बँक खात्यातून ३७ हजार ५५० रुपये आरोपी अँड्रियाने दिलेल्या बँक खात्यावर वळते केले.

ठकसेन अमेरिकन मैत्रीणने फेसबुक अकाउंट केले ब्लॉक -

अमेरिकन मैत्रिणीने दिलेल्या बँक खात्यावर रक्कम जमा केल्याचा संतोष यांनी तिला फेसबुकवरून मेसेज केला. मात्र, यावर तिचा रिप्लाय आला नाही. त्यामुळे संतोष यांनी तिला फेसबुकवर वारंवार संपर्क साधतण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने संतोष यांचे फेसबुक अकाउंट तिने ब्लॉक केले. कस्टम ड्युटी भरून चार महिने उलटून गेले तरीही रोज अँड्रियाने आपल्याला पाठवलेल्या वस्तू मिळत नसल्याचे पाहून आपली फसवणूक झाल्याचे संतोष यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी ठकसेन अमेरिकन मैत्रीण रोज व तिच्या एका अनोळखी साथीदारावर गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कारवार करत आहेत.

Last Updated : Nov 27, 2020, 5:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details