ठाणे : विविध हतखंडे वापरून चालबाजीने १००हुन अधिक गुन्हे करून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली. त्याला सराईत गुन्हेगारांची वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबिवली रेल्वे स्थानकालगत असलेल्या इराणी वस्तीतून सापळा लावून खडकपाडा पोलिसांनी गजाआड केले आहे. या शंभर नंबरी गुन्हेगाराला पकडण्याचे खडतर काम करणाऱ्या पोलिसाच्या कामगिरीचे वरिष्ठ अधिकाऱ्याकडून कौतुक होत आहे. हैदर तहजीब इराणी (वय,५२) असे या अट्टल गुन्हेगाराचे नाव आहे.
अखेर 'त्या' अट्टल गुन्हेगाराला अटक इराणी वस्तीतील गुन्हेगारांचा नेताअटकेत असलेला हैदर हा इराणी वस्तीतील गुन्हेगारांचा नेता असून त्याचे अनुकरण या वस्तीत केले जात होते. हैदर मोबाईल आणि चेन स्नैचिंग तसेच तोतया पोलीस अधिकारी बनून नागरिकांची लूटमार करण्यात पटाईत आहे. त्याच्यावर देशभरातील विविध राज्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. यात कल्याण-डोंबिवलीत २५, मुंबईत ३५, गुन्ह्याची नोंद असून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरील पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एकत्रित गुन्ह्याची संख्या १०० हून अधिक असल्याची माहिती खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक पवार यांनी दिली.
पोलिसांवर हल्ल्याचा मास्टर माईंडइराणी वस्तीत लपलेल्या आरोपीला पकडण्यासाठी 2 मार्च 2021 रोजी वस्तीत आलेल्या वसई पोलिसांवर प्राणघातक हल्ला करून आरोपीला पळून जाण्यात मदत करण्यात आली होती. या हल्ल्याचा मास्टर माईंड हैदर असल्याचे उघड झाले आहे. आरोपीला पळवून नेतानाचे हैदरचे सीसीटीव्ही फूटेज पोलिसाच्या हाती लागले होते. कुख्यात हैदर तेजीब इराणी उर्फ सैयद या 52 वर्षीय गुन्हेगाराला गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोनि शरद झिने यांनी जेरबंद केले.
यापूर्वी इराणी कबिल्यातून बुहतांश गुन्हेगारांना केली अटकयाच गुन्हेगारांच्या इराणी कबिल्यातून मोहंमद उर्फ मम फयाज इराणी उर्फ जाफरी उर्फ सैयद, हमजा अंतुनी इराणी, मुसा रजा इराणी उर्फ सैयद या तिघांना या कारवाईदरम्यान बेड्या ठोकण्यात आल्या. तर मुंबई पोलिसांना हव्या असलेल्या जग्गु फैयाज इराणी, जाफर आसीफ इराणी, तालीब नौसिर इराणी व सादक रहिमत इराणी यांचाही या इराणी कबिल्यात शोध घेऊन त्यांना पकडून घाटकोपर पोलिसांच्या हवाली करण्यात आले. या भागातील चोरट्यांचा मुखीया अशी त्याची ओळख असल्याने तो पकडला गेल्याने गुन्हेगारी काही प्रमाणात तरी आटोक्यात येईल, अशी आशा पोलिसांनी व्यक्त केली.