ठाणे- कुप्रसिद्ध गुंड नरेश पहलाजानी उर्फ नरेश चड्डी हत्येप्रकरणी उल्हासनगरातील काँग्रेसचे माजी नगरसेवक तथा प्रसिद्ध उद्योगपतीसह त्याचा मुलावर आणि एका साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, नरेश चड्डी याच्या हत्येच्या ४ वर्षानंतर हा गुन्हा खडकपाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरामुळे उल्हासनगरात एकच खळबळ उडाली आहे.
माजी नगरसेवक गोदुमल उर्फ गोदू नारायणदास किशननी, त्याचा मुलगा प्रवीण किशननी याच्यासह रवी असे हत्येचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. एकेकाळी मृत नरेश पहेलाजानी उर्फ चड्डी हा उल्हासनगरातील कुप्रसिद्ध गुंड म्हणून ओळखला जायचा. कालांतराने तो उल्हासनगर सोडून कल्याणातील खडकपाडा परिसरातील साई चौकातल्या साई पॅराडाईजमध्ये कुटुंबासह राहत होता. नरेश पहेलाजानी उर्फ चड्डडी याचा ३ फेब्रुवारी २०१६ रोजी राहत्या घरी मृत्यू झाला होता. त्यावेळी या घटनेची खडकपाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान मृत नरेश याची पत्नी दीपा, मुलगा प्रवीण व मोठा भाऊ राजू यांनी दिलेल्या फिर्यादित मृत नरेश पहेलाजानी हे उल्हासनगरात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात साक्षीदार होते. त्यामुळे, नरेश यांनी आरोपी गोदुमल उर्फ गोदू नारायणदास, त्यांचा मुलगा प्रवीण किशननी यांच्यापासून आपल्या जिवाला धोका असल्याचे सांगितले होते.