ठाणे - कोरोनाचा आजार २४ तासातच शंभर टक्के बरे करणारा एक व्हिडिओ मागील आठ दिवसांपासून सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला. या व्हिडिओमुळे आरोग्य जगतात खळबळ उडाली. त्यांनतर व्हायरल व्हिडिओची सत्यता जाणण्यासाठी प्रयत्न केला. तर हा व्हिडिओ अंबरनाथ तालुक्यातील वांगणी गावात असलेल्या एका क्लिनिकमध्ये कोरोना रुग्णांवर खरच उपचार सुरू असल्याचे पाहावयास मिळाले. त्या व्हायरल व्हिडिओमधील तो रुग्णही येथे उपस्थित होता. त्यावेळी त्याला विचारले असता माझे ९० टक्के लग्न्स (फुप्फुस) बाधित झाले होते. मात्र, येथे उपचारानंतर कोरोनातून बरा झाल्याचे त्याने सांगितले. तर शीला क्लिनिक चालविणारे डॉ. यु. एस. गुप्ता यांच्याशी संपर्क साधला असता आतापर्यत २९ हजारांच्यावर कोरोना रुग्णांना होमियोपॅथिक औषधाने बरे केल्याचा त्यांनी दावा केला. मात्र, कोरोना रुग्णांवर उपचारासाठी लागणारी आरोग्य विभागाची परवनगी न घेताच उपचार केल्याने डॉक्टरसह एका महिला डॉक्टरावर कुळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे देशभरात कोरोना रुग्णांवर उपचारासाठी शासकीय व खासगी कोविड रुग्णालयात अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रणासह इंजेक्शन व औषधे देऊन रुग्ण बरे केले जातात. अश्यातच गुन्हा दाखल झालेल्या डॉ. यु. एस. गुप्ता यांनी दावा केला की, माझ्या होमियोपॅथिक औषधाच्या ड्रॉपचे दोन थेंब नाकात टाकल्यावर कोरोना रुग्ण बरा होतो. मात्र, हा दावा 'किती खरा, किती खोटा' हे तर पोलिसांच्या तपासाअंती सत्य समोर येईल.
चाळीत पत्र्याच्या खोलीत कोरोना रुग्णांवर उपचार
एकीकडे कोट्यवधी निधी खर्चून शासनाच्या वतीने ठिकठिकाणी हजारो खाटांचे जम्बो कोविड रुग्णालय उभारली गेली आहे. तसेच या रुग्णालयात कोविड रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रणासह इंजेक्शन व औषधे देऊन रुग्ण बरे केले जात आहे. मात्र, ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातून कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी न घेताच डॉ. गुप्ता यांनी एका महिला डॉक्टरसह वांगणी पश्चिम परिसरात असलेल्या अन्सारी चाळ लगतच १० बाय २० च्या पत्र्याच्या खोलीत दाटीवाटीने कोरोना रुग्णांवर उपचार केले जात असल्याचे दिसून आले. शिवाय या पत्र्याच्या खोलीतील या क्लिनिकमध्ये ना व्हेंटिलेटर, ना ऑक्सिजन, ना सॅनिटायझर, ना रुग्णांच्या ना डॉक्टरच्या तोडाला मास्क तरीही प्रकृती चिंताजनक असलेले रुग्ण कोरोनामुक्त कसे होतात हा संशोधनाचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे डॉ. गुप्ता कोरोनाग्रस्त रुग्णांची तपासणी केल्यानंतर केवळ बोरिक पावडरने हात धुतात, तसेच रुग्णांच्या हातावरही बोरिक पावडर टाकून हात धुण्यास सांगतात. त्यामुळे शासनाचे कोरोना नियम बाजूला सारून खरच असे उपचार कितपत योग्य आहे, असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
आतापर्यंत २९ हजारांच्यावर कोरोना रुग्ण बरे केल्याचा दावा
डॉ. गुप्ता यांच्या शीला क्लिनिकमध्ये चिंचोळ्या जागेतच रुग्णांसाठी कडप्पा लादीचे ३ ते ४ बेड आहेत. याच बेडवर आतापर्यत २९ हजारांच्यावर कोरोना रुग्ण बरे केल्याचा दावा डॉ. गुप्ता यांनी केला आहे. विशेष म्हणजे व्हायरल व्हिडिओ पाहून रुग्णांचे नातेवाईक रुग्णांना घेऊन डॉ. गुप्ता यांच्याकडे उपचारासाठी मोठ्या प्रमाणात येत आहे. यामध्ये परराज्यातील रुग्णांसह मुबंई, ठाणे, कल्याण, बदलापूर, नाशिक, मुरबाड, पनवेल अशा विविध शहरातून रुग्णांची रांग पहाटेपासूनच लागत असल्याचे सांगण्यात आले.