नवी मुंबई - ऐरोली सेक्टर ८ येथे विद्युत संचार झालेल्या शिडीला हात लागल्याने ९ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. ही घटना शिवशंकर प्लाझा २ येथील इमारतीबाहेरील लेन्स कार्टच्या दुकानासमोर घडली. विजेचा शॉक इतका भयंकर होता की त्यात मुलाचा जागेवरच कोळसा झाला.
हेही वाचा -धक्कादायक! हळदी समारंभात तिघांवर प्राणघातक हल्ला, एक ठार दोन गंभीर
अधिक माहिती अशी की, लेन्स कार्ट दुकानासमोर कामानिमित्त २५ फूट उंच शिडी ठेवण्यात आली होती. ही शिडी विद्युत वाहिनीला चिकटल्याने त्यात विद्युत प्रवाह संचारला होता. दरम्यान, सिग्नलवर पिशव्या विकणाऱ्या मुलाचा त्या शिडीला चुकून हात लागला. हात लावताच मुलाला विजेचा जोरदार धक्का लागला. १० मिनिटात मुलाचे शरीर जळून खाक झाले. मुलाला ११ हजार व्होल्टचा विद्युत धक्का बसला होता. ही घटना पाहून परिसरात चांगलीच घबराट पसरली. माहिती मिळताच एमएसईबीचे कर्मचारी, पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.
याबाबत संबंधित सोसायटीने काम करण्यापूर्वी कोणतीही परवानगी न घेतल्याचे एमएसइबीचे अधिकारी जाधव यांनी सांगितले. तसेच, दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे एमएसइबीचे अधिकारी बोधनकर यांनी सांगितले. तर, अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
हेही वाचा -पोलिसांचा वाहतूक सप्ताह संपताच पुन्हा 'ट्रॅफिक जॅम'