ठाणे - बारवी धरणात मुबलक पाणीसाठा जमा झाल्यामुळे तूर्त तरी ठाणे जिल्ह्यातील पाणी समस्या मिटली आहे. या धरणात आतापर्यंत ९०.२० टक्के पाणीसाठा असून ते भरण्यासाठी अवघी एक मीटर पाणीपातळी बाकी असल्याची नोंद बारवी धरण प्रकल्प राबविणाऱ्या औद्योगिक विकास महामंडळाने घेतली आहे.
गेल्या आठ दिवसापासून रविवारीपर्यत बऱ्यापैकी पाऊस झाला. सोमवारी मात्र जिल्ह्यात पावसाने काही अंशी विश्रांती घेतली आहे. गेल्या २४ तासात जिल्हाभरात अवघा २० मिमी पाऊस पडल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने केली आहे. तसेच कल्याण -डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा भाईंदर आणि ठाणे महापालिकाच्या काही भागासह ग्रामीण क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या उल्हास नदीवरील आंध्रा धरणात १३ मिमी पाऊस पडला असून त्यातही ६१ टक्के पाणीसाठा आहे.