ठाणे -एका तलावात तब्बल ८० हून अधिक कासवांचा मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. ही घटना कल्याण पश्चिमेकडील गौरीपाडा तलावात घडली असून तलावातील दूषित पाण्यात असणारे घातक पदार्थ पोटात गेल्याने या कासवांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. बेरली येथील व्हिसेरा फॉरेन्सिक लॅबमधून उपलब्ध झालेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. कासवांच्या मृत्यूमुळे प्राणीप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.
२२ जानेवारी रोजी घडला प्रकार
कल्याण पश्चिम परिसरात असलेल्या गौरीपाडा तलावात २२ जानेवारी रोजी काही कासव मृतावस्थेत आढळली होती. या तलावात लागोपाठ दोन दिवसात तब्बल ८० हुन अधिक कासव मृतावस्थेत आढळल्याने या कासवांच्या मृत्यूबाबत गूढ निर्माण झाले होते. प्राणीमित्र संघटना व वन विभागाने तत्काळ धाव घेत मृत कासव तपासणीसाठी ताब्यात घेतले होते. मृत कासवांचा व्हिसेरा फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आला होता. यानंतर कासव कशामुळे दगावले? याची तपासणी करण्यात आली. या व्हिसेरा तपासणीचा अहवाल कल्याण वन विभागाकडे प्राप्त झाला असून या अहवालात कासवांचा मृत्यू घातक विषाणू पोटात गेल्यानेच झाल्याचे निदान नोंदवण्यात आले आहे.