ठाणे- उल्हासनगर विधानसभा निवडणुकीत गेल्या वेळी राष्ट्रवादीच्या आमदार ज्योती कलानी यांनी भाजपचे उमेदवार कुमार अयलानी यांचा पराभव केला होता. यंदा मात्र, उल्हासनगर मतदारसंघात गेल्या वेळेपेक्षा ८.९० टक्के मतदानात वाढ झाल्याने कलानींच्या साम्राज्याला धोका निर्माण झाल्याची चर्चा मतदारसंघात आहे.
उल्हासनगर मतदारसंघात गेल्या वेळेपेक्षा ८.९० टक्के मतदानात वाढ हेही वाचा -वरळीत 1 लाख 29 हजार मतदान; आदित्य ठाकरेंना सव्वालाख मतं मिळण्याचा दावा ठरणार फोल
उल्हासनगर विधानसभेत ४६.९० टक्के मतदानाची नोंद झाली. तर, २०१४ मध्ये ३८ टक्के मतदान झाले होते. यंदा मात्र, ८.९० टक्के मतदानात वाढ झाली आहे. विशेष म्हणजे उल्हासनगरच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार ज्योती कलानी यांनी सुनेला भाजपची उमेदवारी मिळावी म्हणून ऐन तिकीट वाटपावेळी तडकाफडकी आमदारकीचा राजीनामा दिला. मात्र, भाजपने माजी आमदार व जिल्हाअध्यक्ष कुमार आयलानी यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे उल्हासनगरात कलानीचे साम्राज्य अबाधित राखण्यासाठी अखेर राष्ट्रवादीतूनच पुन्हा ज्योती कलानी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
हेही वाचा -राज्यात विधानसभेसाठी ६१.१३ टक्के मतदान, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांची माहिती
भाजप जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी हे माजी आमदार आहेत. त्यांनी 2009 मध्ये कुख्यात पप्पू कलानी यांचा पराभव केला होता. 2014 मध्ये शिवसेना आणि भाजप वेगवेगळे लढल्यामुळे अवघ्या 1800 मतांनी कुमार आयलानी यांचा आमदार ज्योती कलानी यांनी पराभव केला होता. यंदाच्या निवडणुकीत महायुतीत असलेल्या आठवले गटाचे जिल्हाअध्यक्ष भगवान भालेराव यांनी बंडखोरी करत निवडणुकीच्या रिंगणात उतरले. उल्हासनगरातील झोपडपट्टी भागात मोठ्या प्रमाणात दलित मतदारांची एकगठ्ठा मतं आहेत. त्यामुळे युतीच्या मतांवर त्यांचा काही प्रमाणात परिणाम होणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, त्यांचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादीच्या उमेदवार आमदार ज्योती कलानी यांना मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाढलेला मतांचा टक्का कोणाच्या पारड्यात पडला हे येणाऱ्या २४ तारखेलाच निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे.