ठाणे : कुळगाव बदलापूर नगरपरिषद हद्दीत चार दिवसांपूर्वी पूर्व आणि पश्चिमेकडील परिसरात कोरोना बाधित तीन रुग्ण आढळले होते. त्या तीनही पॉझिटिव रुग्णाच्या नातेवाईकांना नगर परिषद प्रशासनाने त्याच दिवशी क्वारंटाईन केंद्रात दाखल केलं होते. दाखल असलेल्या त्या आठही जणांचा गुरुवारी सांयकाळच्या सुमारास कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रियेश जाधव यांनी दिली आहे.
चार दिवसांपूर्वी बदलापुरात कोरोना पॉझिटिव रुग्ण आढळून आले होते. त्यावेळीच बदलापूर नगरपरिषदेने पूर्व व पश्चिमेकडील या रुग्णांना कंटेनमेंट केला होता. तर या रुग्णांचे जवळचे नातेवाईक आणि त्यांच्या बिल्डिंगमध्ये राहणारे आपापसातील नातेवाईकांना कुळगाव बदलापूर नगरपरिषदेने क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल केलं होतं. त्यामुळे हे नागरिक अजून कोणाच्या संपर्कात आले नसल्याने मोठा धोका टळला आहे. असे असले तरी हे रुग्ण यापूर्वी ज्यांच्या संपर्कात आले आहेत त्यांचा शोध घेण्यास आता कुळगाव बदलापूर नगरपरिषद यांनी सुरुवात केली आहे.