ठाणे - भिवंडी शहरात धामणकर नाका परिसरात असलेल्या पटेल कंपाऊंडमधील तीन मजली इमारत आज पहाटेच्या सुमारास कोसळून आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून जखमींना बाहेर काढण्याचे काम बचाव पथक करीत आहेत. मात्र या घटनेमुळे पुन्हा एकदा भिवंडीतील 782 धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला असून सुमारे 25 हजार कुटुंबांच्या म्हणजे सुमारे एक लाख नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, 782 धोकादायक इमारतींपैकी 210 इमारत अतिधोकादायक असून आज दुर्घटना घडलेली जिलानी इमारत त्यामधीलचआहे.
मागील तीन वर्षांंत भिवंडीत विविध ठिकाणी झालेल्या इमारत दुर्घटनेत कालपर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला होता. तर, 42 जण जखमी झाले होते. त्यामुळे शासनाने दखल घेऊन अनधिकृत धोकादायक इमारती तोडून टाकण्याचा निर्देश पालिका प्रशासनाला दिले होते. मात्र पालिका प्रशासनाने कारवाई झाल्याचे कागदावरचदाखवून इमारतींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
भिवंडी-निजामपूर शहरात महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरातील धोकादायक इमारतींची संख्या वाढतच आहे. यातील 43 इमारती तोडण्याची कारवाई हाती घेण्यात येणार असल्याचे, पालिका प्रशासनाकडून काही दिवसांपूर्वीसांगण्यात आले होते. पण ती कारवाई करण्यात आलीच नाही. तशात महापालिका केवळ धोकादायक इमारती रिकाम्या करा, अशा नोटिसा देऊन त्यांचे पुनर्वसन न करता आपली जबाबदारी झटकत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत.