महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महापुरात ७ हजार ३०० हेक्टर शेतीचे नुकसान; नुकसानीचे पंचनामे सुरू - flood affected farm land in thane

नुकसान भरपाईसाठी जिल्हा प्रशासनाकडून राज्य शासनाकडे ५ कोटी ५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून सर्व नुकसानीचे पंचनामे सरकारी यंत्रणेकडून सुरू झाले आहेत. मात्र पावसामुळे जिल्ह्यात ५० कोटींपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाजात वर्तविण्यात आले आहे.

महापुरात ७ हजार ३०० हेक्टर शेतीचे नुकसान

By

Published : Aug 20, 2019, 6:30 PM IST

ठाणे- जुलै व ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात विक्रमी पावसाची नोंद झाली. या पावसामुळे जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण परिसराचा बहुतांश भाग पाण्याखाली गेला. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण परिसरात सुमारे १९ हजार शेतकऱ्यांचे ७ हजार ३०० हेक्टर शेतीचे नुकसान झाले असल्याचे प्राथमिक माहितीत समोर आले. या पार्श्वभूमीवर सरकारी यंत्रणेकडून नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहे.

महापुरात ७ हजार ३०० हेक्टर शेतीचे नुकसान

या नुकसान भरपाईसाठी जिल्हा प्रशासनाकडून राज्य शासनाकडे ५ कोटी ५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून सर्व नुकसानीची पंचनामे सरकारी यंत्रणेकडून सुरू झाली आहे. मात्र पावसामुळे जिल्ह्यात ५० कोटींपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाजात वर्तविण्यात आले आहे.

या कारणांमुळे आला पूर

ठाणे जिल्ह्यात शहरी आणि ग्रामीण भागात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढले आहे. त्यासाठी भरमसाठ बांधकामे करण्यात आली. ही बांधकामे करत असताना नैसर्गिक नाले बुजवण्यात आले. तर काही ठिकाणचे नाले चुकीच्या पद्धतीने वळविण्यात आले होते. परिणामी मुसळधार पावसामुळे जमा झालेल्या पाण्याला जाण्यासाठी जागा नसल्याने बहुतांश नद्यांना पूर आला. त्यामुळे विविध शहरांच्या सखल भागात पुराचे पाणी शिरले. त्यामुळे रस्तेही पाण्याखाली गेले व हजारो नागरिकांच्या घरात पाणी शिरले. यामुळे आता हजारो कुटुंबे रस्त्यावर आली आहे.

.....या भागांमध्ये झाले नुकसान

कल्याण पश्चिमेत रेतीबंदर, वालधुनी, शिवाजीनगर, योगीधाम परिसर कल्याण पूर्वेतील पिसवली, सोनारपाडा, आडवली, ढोकळी, टिटवाळातील काही भाग तसेच कल्याण-मुरबाड रस्त्यावरील वरप, कांबा ,रायता, डोंबिवलीतील कुंभार पाडा, गरीबाचा पाडा, महाराष्ट्र नगर, मोठागाव ठाकुर्ली, बदलापूर पूर्व पश्चिम, वांगणी, अंबरनाथ, भिवंडीतील कोनगाव, नदी नाका, तीन बत्ती, उल्हासनगरात तसेच भिवंडी शहापूर व मुरबाड तालुक्यातील ग्रामीण भागातील नदीकाठी असणाऱ्या शेतीचे व अनेक गाव पाड्यांचे नुकसान झाले आहे.

आतापर्यंत २० कोटींचे वाटप तर १२ कोटींची जादा मागणी

पूर ओसरल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार तहसीलदारांकडून नुकसान ग्रस्तांचे पंचनामे सुरू करण्यात आले. त्यानुसार सुमारे २० कोटी रुपयांचे प्राथमिक आर्थिक सहाय्य जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य शासनाकडून मागविले होते. त्यापैकी २० कोटी रुपयांचे वाटप तहसीलदारांना करण्यात आले आहे. कल्याण तालुक्‍यात ६ हजार २७२, भिवंडी तालुक्यात ४ हजार ३७५, अंबरनाथ ६ हजार ५३, उल्हासनगर ५५०, शहापूर ३१०, मुरबाड ३९५ असा एकूण १७ हजार ९५८ लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी २० कोटी रुपये तहसीलदार कार्यालयात वर्ग करण्यात आले आहे.

शेतीचे पंचनामे सुरू

महापुरात जिल्ह्यातील सुमारे १९ हजार शेतकऱ्यांचे ७ हजार ३०० हेक्टर शेतीचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यासाठी ५ कोटी ५ लाख रुपयांची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली असून अद्यापही शेतीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. त्याचा अंतिम अहवाल लवकरच अपेक्षित असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक अंकूश माने यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details