ठाणे- जिल्ह्यात ठाणे, कल्याण, आणि भिवंडी अशा तीन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या ६६ उमेदवारांपैकी ६० उमेदवारांना आपली अनामत रक्कम गमावली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावरील उमेदवार सोडले असता इतर सर्व उमेदवारांना आपली अनामत रक्कम राखता येईल इतकी मतेही मिळवता आली नाहीत.
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मतदारसंघामध्ये एकूण वैध मतांच्या एक-पंचमांश मते मिळवणाऱ्या उमेदवारांना त्यांची अनामत रक्कम परत दिली जाते. म्हणूनच ठाण्यातील २१ कल्याणमधील २६ आणि भिवंडीतील १३ उमेदवारांची रक्कम जप्त झाली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण २३ उमेदवार उभे होते. यापैकी २१ जणांची अनामत रक्कम जप्त होणार आहे. ठाण्यात ११ लाख ५० हजार ९२ मते वैध ठरली होती. त्यामुळे अनामत रक्कम राखण्यासाठी किमान २ लाख ३० हजारांपेक्षा अधिक मते मिळवण्याची गरज होती. परंतु २३ पैकी शिवसेनेचे विजयी उमेदवार राजन विचारे आणि पराभूत राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांनाच ही मते मिळाली आहेत.
कल्याणमध्ये सर्वाधिक २८ उमेदवारांमध्ये एकूण ८ लाख ७७ हजार ३०१ मते वैध ठरली. इथे १ लाख ७५ हजारांहून अधिक मते मिळवणाऱ्या उमेदवारांना अनामत रक्कम मिळू शकणार आहे. या उमेदवारांमधील शिवसेनेचे श्रीकांत शिंदे आणि राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांना वगळता उर्वरित उमेदवारांना तितकी मते मिळू शकली नाहीत.
भिवंडीमध्ये १५ उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये होते. या ठिकाणी ९ लाख ८८ हजार ७७५ वैध मते असून अनामत रक्कम टिकवण्यासाठी किमान १ लाख ९७ हजार ७५५ पेक्षा अधिक मते मिळवणे आवश्यक होते. या १५ उमेदवारांपैकी विजयी उमेदवार कपिल पाटील आणि पराभूत उमेदवार सुरेश टावरे यांना त्यापेक्षा जास्त मते असून उर्वरित उमेदवारांना हा आकडा गाठता आलेला नाही. त्यामुळे त्यांची सर्व अनामत रक्कम जप्त झाली आहे.