महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

६ वर्षाच्या गिर्यारोहकाने सर केला ३१०० फुट उंचीचा सुळका, ठाण्याच्या सात्विकचे सर्वत्र कौतुक - thane

साहस आणि मजबूत पकड आतापासून त्याच्या अंगी आहे. त्यामुळे अगदी हसत खेळत लिंगाणा त्याने सर केला. इतक्या लहान वयातच लिंगाणावीर म्हणून त्याचे कौतुक संपूर्ण महाराष्ट्रातून होत आहे. त्याचे वडील चेतन कारेकर हे त्याला नेहमी प्रोत्साहन देत असतात. लिंगाणाच्या या मोहिमेत सात्विकचे मार्गदर्शन सागर नलवडे यांनी केले.

बा रायगड टीमसह सात्विक

By

Published : May 5, 2019, 1:21 PM IST

Updated : May 5, 2019, 1:41 PM IST

ठाणे- महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधुन कल्याणच्या सात्विक कारेकर या ६ वर्षीय चिमुरड्याने लिगांणा सुळका सर केला आहे. हा सुळका सर करुन सात्विकने गड किल्ल्यांना वाचवण्याचा सल्ला दिला आहे. लिंगाणा सुळका हा महाराष्ट्रातील अवघड सुळक्यापैकी एक मानला जातो. त्यामुळे सात्विकवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.


लिंगाणा म्हणजे काळजात धडकी भरवणारा महाराष्ट्रातील एक अभेद्य सुळका मानला जातो. लिंगाणा सुळका सर करायचा हे प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न असते. पण लिंगाणा सर करणे येड्या गबाळ्याचे काम नाही. त्यासाठी गिर्यारोहकाच्या अंगात जिगर आणि उरात जिद्द असावी लागते. हे असल्यास वय हा मुद्दा गौण ठरतो. हे सहा वर्षांच्या सात्विक कारेकरने सिद्ध केले आहे. ३१०० फुट उंच सुळका सर करुन त्याने अतुलनीय पराक्रम गाजवला आहे.

लिंगाणा सुळका चढताना सात्विक


आईकडून गिर्यारोहणाचे धडे
'बा रायगड' परिवार आयोजित महाराष्ट्र दिन विशेष लिंगाणा आरोहण मोहिमेत ६ वर्षीय सात्विक याने सहभाग घेतला होता. सात्विक चेतन कारेकर याची आई चैत्राली कारेकर यांना गडकिल्ले भटकंतीची आवड आहे. सात्विकला त्यांनी अगदी ५ वर्षांपासून गड कोटांची भटकंती करण्यास शिकवली. आपल्या मुलानेही सुळके सर करावेत आणि एक उत्तम गिर्यारोहक बनावे अशी सात्विकची आई चैत्राली यांची इच्छा आहे.


'बा रायगड'च्या सगळ्या मोहिमेत सात्विकचा सक्रिय सहभाग असतो. संवर्धन मोहीम असो, प्रदक्षिणा मोहीम असो, वा अभ्यास मोहीम असो सगळीकडे तो उत्साहाने सहभागी होतो. त्यामुळे गडकिल्ल्यांच्या भटकंतीची किल्ली त्याला सापडली आहे. बा रायगड परिवारावर विश्वास ठेवून महाराष्ट्र दिनी अवघ्या ६ वर्षाच्या सात्विकने लिंगाणा सर करून महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे.

सात्विकमध्ये साहसी गिर्यारोहकाची लक्षणे
साहस आणि मजबूत पकड आतापासून त्याच्या अंगी आहे. त्यामुळे अगदी हसत खेळत लिंगाणा त्याने सर केला. इतक्या लहान वयातच लिंगाणावीर म्हणून त्याचे कौतुक संपूर्ण महाराष्ट्रातून होत आहे. त्याचे वडील चेतन कारेकर हे त्याला नेहमी प्रोत्साहन देत असतात. लिंगाणाच्या या मोहिमेत सात्विकचे मार्गदर्शन सागर नलवडे यांनी केले. त्यांनी अवघ्या १६ मिनिट ४० सेकदांत हाच लिंगाणा सुळका विनासाहित्य सर केला आहे.

सात्विक लहान म्हणून त्याला वर नेण्यासाठी टीमला जास्त मेहनत घ्यावी लागली नाही. अभिमन्यूला ज्याप्रमाणे आईच्या पोटातच चक्रव्यूह भेदण्याचे ज्ञान अवगत होते अगदी तसेच काही सात्विकला चढाई करताना पाहून वाटत होते. उत्साह तर होताच पण त्यासोबत त्याची चाल वाखाणण्याजोगी आहे. बोरट्याची नाळ उतरत असताना योग्य दगड पाहून ठेवलेली पाऊले, चढाई करताना दगडाला शोधत असलेली ग्रीप, अन् ती सापडत नाही हे बघून रोपने क्लाईम्ब करण्याचे प्रसंगावधान, निडर स्वभाव हे त्यात असलेल्या भावी गिर्यारोहकाची छाप सोडतात.

विशेष म्हणजे हा मोहरी - लिंगाणा - मोहरी या दरम्यान दमला असे वाटले नाही. चढाई करताना त्याच्या दमून भागून बसलेल्या आईला तर मिश्किलपणे चल की पुढे असे म्हणून प्रोत्साहित करत होता. सात्विक भविष्यात नक्कीच एक मोठा गिर्यारोहक होणार असल्याचा विश्वास त्याचे मार्गदर्शक सागर नलवडे यांनी व्यक्त केला.

Last Updated : May 5, 2019, 1:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details