ठाणे - नापास करण्याची धमकी देऊन ६ अल्पवयीन शाळकरी मुलींवर शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना मोहनेजवळ असलेल्या एका प्राथमिक शाळेत घडली. याप्रकरणी आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा -आमचं चुकलचं.. सदाभाऊ खोतांवर काय म्हणालेत राजू शेट्टी
या शिक्षकाविरोधात कल्याण तालुका पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. मोहने परिसरातील गाळेगावात खासगी संस्थेची प्राथमिक शाळा आहे. या शाळेत आरोपी शिक्षक ५ व्या वर्गाला शिकवतो. गेल्या ६ महिन्यांपासून येथील शाळकरी मुलींवर हा शिक्षक अत्याचार करीत होता. यातील एका पीडितेने तिच्या आईला हा प्रकार सांगितल्यानंतर हा घृणास्पद गुन्हा समोर आला.
हेही वाचा -ठरलं..! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा जाणार अयोध्येला
या घटनेने संतप्त नागरिकांनी नराधम शिक्षकाला बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. शाळा व्यवस्थापनाने या नराधमाला निलंबित केले असून त्याबाबतचा अहवाल जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. शाळेच्या हजेरी पुस्तकातूनही त्याचे नाव वगळण्यात आल्याने आरोपीने शाळा व्यवस्थापन समितीकडे राजीनामा सुपूर्द केला. या आरोपीने आणखी काही विद्यार्थिनींवर अत्याचार केला आहे का, याबाबत पोलीस उपनिरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत.