नवी मुंबई - मिशन बिगिन अगेन अंतर्गत टाळेबंदीत सशर्त शिथीलता झाल्यापासून नागरिक मुक्त झाल्यासारखे वावरताना दिसत आहेत. टाळेबंदीत शिथीलता करताना सामाजिक अंतराचे पालन करणे, सॅनिटायझरचा वापर करणे व तोंडाला मास्क लावणे बंधनकारक असल्याचे सांगितले होते. मात्र, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करत त्यांची दुकाने सील करण्यात आली आहे.
पनवेल महापालिका हद्दीतील अनेक जण कामानिमित्त दुसऱ्या शहरात ये-जा करतात. त्याचबरोबर महापालिका हद्दीतील दुकाने सम व विषम तारखेला उघडण्याच्या सुचना पालिका प्रशासनाने दिल्या होत्या. मात्र, अनेक दुकानदारांनी दुकाने सुरुच ठेवली होती. त्यामुळे दुकानांमध्ये मोठ्याप्रमाणात ग्राहकांची गर्दी होत होती. गर्दी नियंत्रणात आणण्याचे काम हे दुकानदारांचेच होते. पण, काही ठिकाणी दुकानदारांनी सामाजिक अंतराचे नियम पायदळी तुडवत गर्दी नियंत्रणात ठेवली नाही. अशा 57 दुकानांवर मागील दोन दिवसांत पालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली.