पनवेल- विधानसभा निवडणुकीसाठी रायगड जिल्ह्यातील सात मतदारसंघात एकूण सुमारे ५६ टक्के मतदान झाले आहे. काही प्रकार वगळता मतदानप्रक्रिया शांततेत पार पडली. तर, राज्यातील सर्वाधिक मतदार असलेल्या पनवेलकरांनी मतदान करण्यासाठी गर्दी केली खरी, पण यापूर्वीच्या निवडणूकीतील मतदानाची टक्केवारी पाहता यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पनवेलकरांचा निरुत्साह दिसून आला.
सुरुवातीला मतदानाचा वेग कमी होता, परंतु सकाळी १० नंतर मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी घराबाहेर पडले. त्यामुळे ग्रामीण भागात मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. पण दुपारी 1 नंतर मतदारांचा हाच उत्साह घसरला, आणि तो २८ टक्क्यांवर पोहोचला. हाच आकडा दुपारी ३ नंतर थोड्या प्रमाणात वाढला आणि तो ३८ टक्के झाला. पनवेलमधील अनेक सिडको वसाहतीत 'नो वॉटर नो वोट'चे बॅनर लावल्याने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सिडको वसाहतीतील नागरिकांनी पाठ फिरवली. या सर्वांचा परिणाम म्हणजेच मतदानाची टक्केवारी घटली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४८ टक्के तर सायंकाळी ६ पर्यंत केवळ ५६ टक्क्यांवर पनवेलचे मतदान पार पडले.