ठाणे -मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या एका गावातून दमन व गोवा येथे उत्पादित होणाऱ्या ५० लाखांचा विदेशी मद्याचा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून जप्त केला आहे. विशेष म्हणजे जप्त केलेल्या विदेशी मद्य विक्रीस राज्यात बंदी आहे. या प्रकरणी तीन दारू माफियांना अटक करण्यात येऊन त्यांच्याकडून दारू तस्करीसाठी वापरण्यात येणारी दोन आलिशान वाहनेही ताब्यात घेतली आहेत. वासुदेव किशन चौधरी (रा. काटई गाव), रंजन शेट्टी (रा. नेवाळी पाडा ) व गुलाम अहमद राजा (रा.कोळीवाडा, मुंबई) असे अटक केलेल्या दारू तस्करांची नावे आहेत.
राज्यात विक्रीला प्रतिबंध असलेली दमन - गोवा निर्मित दारू अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडच्या पायथ्याशी असलेल्या कुंभार्ली गावात शिवआरती बंगल्याच्या बाजुला पत्र्याच्या शेडमध्ये साठवून ठेवून विक्री होत होती. ही गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार शनिवारी सायंकाळच्या सुमारास पोलिसांनी सापळा रचून बंगल्याच्या आवारातील या दुकानावर धाड टाकली. धाडी दरम्यान व्हिस्की, मॅकडॉल, ब्ल्यू व्हिस्की असा विविध कंपनीचे विदेशी मद्याचे बॉक्स मिळून आले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत ५० लाख रुपये आहे. शिवाय पोलिसांनी होंडासिटी कार, स्विप्ट कार आणि एक दुचाकी तसेच तीन महागडे मोबाईल व रोख रक्कमही माफियांकडून जप्त करण्यात आली आहे.