ठाणे -नववर्षाच्या पूर्वसंध्येला ठाणे अनैतिक मानवी तस्करी पथकासह स्थानिक पोलिसांनी कल्याण पश्चिम परिसरातील दोन चायनीज सेंटरवर छापेमारी करून, ५ बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा कल्याणात बांगलादेशी नागरिकांचे वास्तव्य असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.
भारतात बेकायदा वस्तव्याप्रकरणी या व्यक्तींविरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोहीद आझाद शेख (वय ३३), जलाल उर्फ दुलाल सुना मियाँ (वय २८), इमोन शिपोन खान (वय २०) या व्यक्तींना कल्याणमधील चार्ली चायनीज सेंटरमधून अटक केली आहे. तर अहमद मोहंमद लाला मियाँ (वय ३०) आणि मुनीर अब्दुल खान (वय २९) या दोघांना दूधनाका परिसरात असलेल्या नुक्कड हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे.
कल्याणमध्ये ५ ते ७ वर्षांपसून वास्तव्य
या पाचही बंगालादेशी नागरिकांचे कल्याणमध्ये गेल्या 5 ते 7 वर्षांपासून वास्तव्य असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. विशेष म्हणजे हे बांगलादेशी नागरिक चायनीज सेंटर व हॉटेलमध्ये कुक, वेटर आणि मॅनेजर म्हणून कार्यरत होते. मात्र ठाणे अनैतिक मानवी तस्करी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलक यांना याबाबत माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे बाजार पेठ पोलिसांच्या साहाय्याने या ठिकाणी छापेमारी करण्यात आली. आणि त्यांना अटक करण्यात आली आहे.