ठाणे : समुद्रसपाटीपासून १६०० मीटर उंचीवरचे असलेले कळसूबाई शिखर अन्वी आणि आद्या या दोन मुलींनी सर केले आहे. कोणत्याही प्रकारची कुरकुर न करता अगदी सराईतपणे हे शिखर सर केल्याची माहिती भ्रमर ट्रेकींग संस्थेचे अध्यक्ष अनुप मालंडकर यांनी दिली. अन्वी आणि आद्याने आपले वडिल कैलास भांगरे व भूषण मोहिते यांच्याकडून वेळोवेळी घेतलेल्या ट्रेकिंग प्रशिक्षण आणि त्यामधील बारकाव्यांच्या अभ्यासामुळे हे शिखर सर करता आले. कळसूबाई राज्यातील गडकोट किल्यांमध्ये सर्वाधिक उंचीवर असल्याने महाराष्ट्रातील एव्हरेस्ट शिखर सर केल्याचा आनंद आम्हा भ्रमर ट्रेकींग संस्थेला झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
कोव्हीड काळात खंड पडला :कोव्हीड काळात खंड पडलेल्या भ्रमर ट्रेकींग संस्थेला ऊर्जा निर्माण करण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष भूषण मोहिते आणि खजिनदार कैलास भांगरे यांच्या पुढाकाराने अन्वी आणि आद्याला कळसूबाई शिखर चढून जाण्याचा प्रस्ताव मांडला. त्यानुसार १३ जानेवारी २०२३ रोजी भंडारदरा जवळील बारी गावात मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी म्हणजे १४ जानेवारी मकरसंक्रांतीच्या दिवशी सकाळी ९.३० वाजता आद्या आणि अन्वी या दोघींनी कळसूबाई पायरीला नमस्कारकरून या दोन चिमुकल्यांनी आपली नाजूक पावले पायरीवरून एकेक टाकून सर केल्याचे सांगितले. दरम्यान या दोन दिवसात त्यांनी जेवणाची कोणत्याही प्रकारे तक्रार न करता ग्रामीण जेवणाचा मनमुराद आस्वाद घेतला.