ठाणे - शहापूर तालुक्यातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे एका दुचाकीस्वाराचा बळी गेला आहे. जिल्ह्यात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा 20 दिवसातील हा चौथा बळी ठरला आहे. विशाल भरत विशे (22) असे मृत्यू झालेल्या या तरुणाचे नाव आहे.
जिल्ह्यात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे बळीचे सत्र सुरूच
मृत विशाल हा शहापूर तालुक्यातील सापगाव रस्त्यावर सकाळच्या सुमारास कामावर जाण्यासाठी निघाला होता. दरम्यान, कांबरे पावर हाऊसजवळ रस्त्यावरील खड्ड्यात त्याची दुचाकी आदळून तो खड्ड्यात पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. विशालच्या मृत्यूमुळे त्याच्या नातेवाईकांनी संबंधित रस्ता ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. आणि जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही, तोपर्यंत विशालचा मृतदेह आम्ही ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतल्याने वातावरण तंग झाले होते. गेल्यावर्षीही शहापूर तालुक्यातील रस्त्यावर रक्षाबंधनच्या दिवशी आई-वडिलांसोबत दुचाकीवरुन जाणाऱ्या बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर आज बुधवारी परत शहापूर तालुक्यातील रस्त्यावरील खड्ड्यांचा विशाल बळी ठरला आहे.
नुकतेच २० दिवसांपूर्वी मुंबई-नाशिक महामार्गावरील वडपे गावानजीक खड्ड्यात दुचाकी आदळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यात दुचाकी खड्ड्यात आदळल्याने सतीश नावाच्या व्यक्ति तोल जाऊन रस्त्यावर पजल्याने अंगावरून भरधाव ट्रक जावून जागीच मृत्यू झाला होता. तो व्यवसायाने लेबर कॉन्ट्रॅक्टर होता, याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात अपघाताच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. तर, ४ दिवसांपूर्वीच कल्याण-शीळ मार्गावरील परिसरातील खड्ड्यांमध्ये दुचाकी आढळून एक दुचाकीस्वार खाली पडल्याने त्याच्या अंगावर टेम्पो जाऊन तो जागीच ठार झाला होता. १३ ऑगस्टला सायंकाळच्या सुमारास उल्हासनगर कॅम्प नंबर 3 येथील हिरा घाट पंचशील नगर रोडवर रवी तपसी जयस्वाल (28) हा दुचाकीवरून जात असताना त्याचीही दुचाकी खड्ड्यात आदळून तो खाली पडला. याच वेळेस त्याच्या अंगावरून टँकर गेल्याने त्याचाही जागीच मृत्यू झाला होता. तर, अंबरनाथमध्येही ५ दिवसांपूर्वी एका पोलीस हवालदाराचा दुचाकी खड्ड्यात आदळून मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
दरम्यान, गेल्यावर्षी पावसाळ्यामध्ये कल्याण शहरात विविध रस्त्यांवर पाच जणांचे खड्ड्यांमुळे बळी गेले होते. त्यावेळी, बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना खड्ड्यांमुळे पाच लोकांचे बळी गेल्याचा प्रश्न पत्रकारांनी विचारला होता. त्यात त्यांनी कल्याण शहराच्या रस्त्यावरून लाखो लोक ये-जा करतात त्यामध्ये पाच नागरिक मृत्युमुखी पडले तर काय झाले, असे वक्तव्य केल्याने त्यांच्यावर सर्व स्तरातून टीकेची झोड उठली होती. त्यानंतर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी कल्याण शहरातील खड्ड्यांचा पाहणी दौरा करून संबंधित प्रशासनाला खड्डे तातडीने बुजवण्याचे निर्देश दिले होते. सोबतच खड्ड्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या नातेवाईकांना मदतीची घोषणा देखील केली होती. मात्र, यावर्षी खड्ड्यांमुळे २० दिवसात 5 बळी जाऊनही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली नाही. यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.