ठाणे- कार आणि रिक्षामध्ये जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात चार जण ठार झाले आहेत. अपघाताची ही घटना रविवारी रात्री अंबरनाथ तालुक्यातील पालेगावच्या नवीन एमआयडीसी रस्त्यावर घडली. अपघात इतका भीषण होता की रिक्षाचा पूर्ण चक्काचूर झाला आहे. वर्षा वलेचा (वय 51), आरती वलेचा (वय 41) , राज वेलेचा (वय 12) आणि रिक्षाचालक किसन विठ्ठल शिंदे असे भीषण अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
अंबरनाथमध्ये कार आणि रिक्षाचा भीषण अपघात कार चालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात..
मिळालेल्या माहितीनुसार भरधाव कार रिक्षावर धडकल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्षा मधून प्रवास करणाऱ्या उल्हासनगर मधील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. तर रिक्षा चालकही जागीच ठार झाला आहे. या अपघात प्रकरणी कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अपघाताची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस अपघातस्थळी दाखल झाले होते. घटनेचा पंचनामा करून चारही मृत्यूदेह उल्हासनगर मधील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आले. या घटनेचा अधिक तपास शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस पथक करीत आहेत,