ठाणे :उल्हासनगर मधील कॅम्प नंबर भागातील कृष्णानगर परिसरात असलेल्या एका घरामध्ये बांगलादेशी नागरिक राहत असल्याची माहिती दहशतवादी विरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे दहशतवादी विरोधी पथकाने विठ्ठलवाडी पोलिसांच्या मदतीने संयुक्तपणे शुक्रवारी दुपारच्या सुमारास छापेमारी करीत चौघांना अटक केली. खलील मनताज मंडल, लिटन जिन्नत शेख, शुकर खातून शेख व नाजीमा अली नाजीर हजहर असे अटक केलेल्या बांगलादेशी नागरिकांची नावे आहेत. त्यांच्या सोबत अन्य साथीदार असल्याचा संशय पोलीस व्यक्त करीत आहेत. आरोपी वैध परवानगी कागदपत्र विना राहत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांच्या साथीदाराचा शोध घेण्यात येत आहे.
यापूर्वीही बांगलादेशींवर कारवाई :भिवंडी शहरातील शांतीनगर, नारपोली आणि भिवंडी शहर पोलिसांनी २०२१ साली छापेमारी करून तब्बल ४० बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती. विशेष म्हणजे यापैकी भिवंडीतील अवनी टेक्सटाईल्समध्ये काम करणाऱ्या ९ बांग्लादेशी नागरिकांना कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. त्यामुळे भिवंडी व आसपासच्या भागात आणखीही बांगलादेशी नागरिक राहत असल्याची शक्यता पोलीस प्रशासनाकडून त्यावेळी व्यक्त केली होती. आता पुन्हा उल्हासनगर शहरात बांगलादेशी नागरिकांचे वास्तव दिसून आल्याने ठाणे व मुंबई जिल्ह्याच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.