ठाणे : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांच्या आकडेवारीने ६००च्या वर टप्पा पार केला होता. मात्र गेल्या दोन दिवसांपासून रुग्णांचा आकडा अर्ध्यावर येऊन म्हणजे ३००च्या जवळपास आल्याने आरोग्य विभागाने धारावीच्या धर्तीवर घरोघरी जाऊन तपासणी सुरु केली. तसेच काही प्रमाणात कडक लॉकडाऊनमुळेही रुग्णांची संख्या निम्म्यावर आल्याचे दिसून आले आहे.
महापालिका क्षेत्रात गेल्या चोविस तासात ३३६ कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ९ जणांचा मृत्यू झाला. तर आतापर्यत १३ हजार ५७६ वर रुग्णांची संख्या पोहचली असून त्यापैकी ६ हजार ९३६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर सध्याच्या स्थितीत ६ हजार ४३३ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आतापर्यत २०७ जणांचा मृत्यू झाला आहे.
धारावीच्या धर्तीवर घरोघरी जाऊन तपासणी सुरु
कोरोनाच्या प्रादुर्भावावर प्रतिबंध घालण्यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरु केले असून महापालिका क्षेत्रात आढळून येणाऱ्या कोरोनाबाधीत रुग्णांच्या परिसरातील सर्वेक्षण करुन हाय रिस्क कॉन्टॅक्टची टेस्ट करुन त्यांस आढळून येणाऱ्या लक्षणानुसार रुग्णालयात दाखल केले जाते, अथवा क्वारनटाईन केले जाते. वाढत्या रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी घरोघरी सर्वेक्षण करणेकामी जनकल्याण समितीचे कार्यकर्ते व कर्मचारी महापालिका क्षेत्रात घरोघरी जावून सर्वेक्षण काम,नागरीकांचे स्क्रिनिंग व पल्स ऑक्सिमीटर द्वारे ऑक्सिजन तपासण्याचे काम करीत आहेत. या सर्वेक्षणात आढळणाऱ्या तापाच्या रुग्णांची महापालिकेतर्फे अँटीजेन टेस्ट करण्यात येणार आहे. ज्यामुळे टेस्टचे निदान लवकर होऊन पुढची उपचार पद्धती ठरविणे महापालिकेस सोयीचे होणार असल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा - अभिजित बांगर नवी मुंबईचे नवे आयुक्त, अण्णासाहेब मिसाळ यांची पुन्हा बदली
दरम्यान, महापालिका क्षेत्रातील जनतेला मदत करण्याच्या दृष्टीकोनातून महापालिका करीत असलेल्या सर्वेक्षणाच्या कामात मदत करु इच्छिणाऱ्या नागरीकांनी, एन.जी.ओनी, इतर सेवाभावी संस्थानी महापालिकेच्या आरोग्य खात्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्यामार्फत करण्यात येत आहे.