ठाणे- कल्याण शहरात गणेशोत्सवसाठी एकत्र जमलेल्या, एकाच कुटुंबातील 40 नातेवाईकांपैकी 32 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे, शिवसेनेच्या एका नगरसेवकाला देखील कोरोनाची लागण झाली असून त्या नगरसेवकाने फेसबुक पोस्टवरून यीबाबत माहिती दिली आहे.
कल्याण पश्चिम परिसरातील जोशीबाग येथे 40 जणांचे कुटुंब गणेशोत्सवात आरतीसाठी एकत्र आले होते. त्यातील एका मुलाला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर या कुटुंबातील सर्वांची तपासणी केली असता 40 नातेवाईकांपैकी 32 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. हे कुटुंब गेल्या 60 वर्षांपासून एकत्र गणेशोत्सव साजरा करत आहे. तर या वृत्ताला कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दुजोरा दिला आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोनाचा फैलाव वाढतच चालला आहे. बाधित रुग्णांच्या आकडेवारीने 30 हजाराचा टप्पा पार केला आहे. पण रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 80 टक्के आहे. ही बाब समाधानकारक असली तरी रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण गेल्या काही महिन्यांत त्या तुलनेत 1.08 टक्क्यांनी वाढले आहे. याआधी मृत्यूदर 1.09 टक्के इतका होता. मात्र हा दर 2.17 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर दुसरीकडे, इतर महापालिकांच्या तुलनेत कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील मृत्यूदर कमी असल्याचा दावा महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने केला होता. तो मात्र फोल ठरताना दिसत आहे.
खळबळजनक बाब म्हणजे, कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा कहर सुरूच असून गेल्या 3 दिवसांत चारशेहून अधिक रुग्ण दरदिवशी वाढत आहेत. तर गेल्या 22 मार्चपासून आजतागायत कोरोना रुग्णांची आकडेवारी 30 हजारांवर गेली आहे. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली असतानाच कल्याणमध्ये गणपती उत्सवसाठी एकत्र आलेल्या कुटुंबातील 40 पैकी 32 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे. बाधित नातेवाईकांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
हेही वाचा -प्रताप सरनाईक यांना तत्काळ अटक करा, कंगना रणौतवरील वक्तव्यानंतर महिला आयोगाची मागणी