ठाणे - मुंबई शहराच्या जवळचा ठाणे हा जिल्हा असला तरी आरोग्य प्रशासन तत्परतेने उचलत असलेल्या पावलांमुळे ग्रामीण भागातील कोरानाबाधिताची संख्या नियंत्रणात आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिष रेंघे यांनी सांगितले. सध्या ग्रामीण भागात २८१ बाधित रुग्णांची नोंद आहे. तर एकूण ३०४ एवढे रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण समाधानकारक आहे.
सध्या शहापूर, मुरबाड नगरपंचायत तसेच निळजे, बदलापूर प्राथमिक आरोग्य केंद्र क्षेत्र पकडून ५६६ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर आरोग्य यंत्रणेच्या नियोजनात्मक कामामुळे कोरानाचा प्रादुर्भाव रोखण्यात आरोग्य प्रशासनाला यश येत असल्याने समाधान व्यक्त केले आहे.
ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष दिपाली दिलीप पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, उपाध्यक्ष सुभाष पवार, सर्व सन्मानीय जिल्हा परिषद विषय समिती सभापती आणि सन्मानीय सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रशासनाच्या सहकार्याने जिल्हयाच्या ग्रामीण भागात कोरानावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येत आहे. या घडीला ११२ प्रतिबंधित क्षेत्र आहेत. एखाद्या भागात कोरोना रुग्ण आढळून आल्यावर आरोग्य यंत्रणेमार्फत तत्काळ ते क्षेत्र प्रतिबंधित करण्यात येते. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना शोधून लक्षणानुसार तात्काळ अलगीकरण किंवा विलगीकरण करण्यात येते व पुढील वैद्यकीय सेवा पुरविण्यात येते. तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येते. या कामासाठी आशा, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, शिक्षक यांची मदत घेण्यात येते. आतापर्यंत १ हजार २१९ पथकाच्या मदतीने साधारण १ लाख २२ हजार कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदे अंतर्गत कोव्हिड केअर सेंटर आणि विलगीकरण कक्ष उभारण्यात आले आहेत.
जिल्हा परिषदेचा निळजे आरोग्य विभाग आणि बदलापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली क्षेत्रातील 27 गावात आरोग्य सेवा पुरवण्यात येत आहे. हा भाग जोखमीचा असून जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी येथे सेवा देण्यासाठी कार्यरत असल्याचे सांगण्यात आले आहे.