महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाण्यात २ पिस्तूल, १२ जिवंत काडतुसांसह तीन शूटर्संना अटक; घातपात टळला

भिवंडी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चावींद्रा गावाच्या पाठीमागे असलेल्या गायत्रीनगर येथे तिघे 'शूटर्स' मोठा घातपात करण्याच्या उद्देशाने येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. तेव्हा पोलिसांनी सापळा लावून तिघांना १ देशी बनावटीचे पिस्तूल, १ गावठी कट्टा आणि १२ जिवंत काडतूसांसह अटक केली.

By

Published : Jun 3, 2019, 10:55 AM IST

ठाण्यात २ पिस्तूल, १२ जिवंत काडतुसांसह तीन शूटर्संना अटक; घातपात टळला

ठाणे - भिवंडी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चावींद्रा गावाच्या पाठीमागे असलेल्या गायत्रीनगर येथे तिघे 'शूटर्स' मोठा घातपात करण्याच्या उद्देशाने येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. तेव्हा पोलिसांनी सापळा लावून तिघांना १ देशी बनावटीचे पिस्तूल, १ गावठी कट्टा आणि १२ जिवंत काडतूसांसह अटक केली आहे.


बाबू बबन मोहिते ( २२ रा. मुंब्रा कॉलनी, दिवा पूर्व ), मुस्ताक अलीम सय्यद ( २० रा.न्यू आझाद नगर, शांतीनगर ) आणि बबलू कैलास जैसवाल (२९ रा. नालासोपारा (प.) असे अटक केलेल्या शूटर्सची नावे आहेत. हे तिघेही भिवंडीत मोठा घातपात करणार असल्याची माहिती ठाणे जिल्हा ग्रामीणचे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकटेश आंधळे यांना मिळाली. तेव्हा त्यांनी एपीआय धनंजय पोरे, अविनाश पाटील आदींच्या पोलीस पथकासह मुंबई- नाशिक जुन्या मार्गावरील गायत्रीनगर रोडवर सापळा रचला.


तेथे काही वेळाने होंडा डिओ स्कुटरवरून तिघे आले, पोलिसांनी त्यांना थांबण्यास सांगितले असता ते पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. त्यावेळी पोलीसांनी त्यांना पाठलाग करून पकडले आणि त्यांची झडती घेतली. या झडतीत १ देशी बनावटीचे पिस्तूल, १ गावठी कट्टा व १२ जिवंत काडतुसे असा ८३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


या घटनेचा भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी अटकेत असलेल्या शूटर्सना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपींना ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोतीराम पवार करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details