ठाणे : ठाणे शहरात सोमवारी फ्लॅटचे स्लॅब सिलिंग कोसळल्याने तीन जण जखमी झाले आहेत तर इतर दोघांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहे. जखमींना उपचारासाठी पराडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना ठाण्याचा नौपाडा परिसरातील भास्कर कॉलनी येथे घडली. येथील एका सात मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या घराचे सिलिंग सकाळी 11 वाजता पडले, असे ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाने (RDMC) एका निवेदनात म्हटले आहे.
इमारत 25 वर्षे जुनी आहे : प्रथमेश सूर्यवंशी (28), विजया सूर्यवंशी (54 वर्ष) आणि अथर्व सूर्यवंशी (14) अशी जखमींची नावे आहेत. सोमवारी सकाळी सुमारे 10:57 वाजता आपत्ती व्यवस्थापन कक्षाला माहिती मिळाली की अमर टॉवर या 25 वर्ष जुन्या सात मजली इमारतीच्या अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला आहे. या अपघातात पाच लोक अडकले होते. ही इमारत नीलकंठ धारा बिल्डिंग, भास्कर कॉलनी, नौपाडा, ठाणे (प.) जवळ आहे. त्यानंतर नौपाडा पोलिस कर्मचारी, उपायुक्त (परिमंडळ - 02) आणि नौपाडा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त आणि कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.