ठाणे - शहरात गेल्या दोन ते तीन दिवसात जवळपास ९ रुग्ण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाले आहेत. या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, आतापर्यंत एकूण २२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ठाणे शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे कोरोनापासून बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाणही वाढत चालले आहे.
गेल्या तीन दिवसात तब्बल ९ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजपर्यंत एकूण २२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. या सर्व रुग्णांवर फोर्टीज, कस्तुरबा गांधी रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, होरायझन हॅास्पिटल, सफायर हॅास्पिटल अशा विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू होते. या सर्व रुग्णांची १४ दिवसानंतरची चाचणी करण्यात आली होती. ती चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. रुग्णांवर उपचार करताना संबंधितांनी दक्षता घेण्याचे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिले आहेत.
कळवा भागात एकाच दिवशी तिघांचा मृत्यू -
शहरात एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे आता मृतांच्या आकड्यातही भर पडू लागली आहे. मंगळवारपर्यंत ठाण्यात कोरोनामुळे सहा जणांचा मृत्यू झाला होता. त्यात बुधवारी आणखी तिघांची भर पडली आहे. कळव्यातील तिघांचा आज मृत्यू झाला आहे. या तिघांचे अहवाल येणे अद्याप बाकी आहे, मात्र त्यांना महापालिकेच्या कळवा रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यामुळे, पालिकेने या तिघांची नोंद सध्या कोरोना संशयित मृत्यू म्हणून केली आहे.
एकाच दिवशी तीन कोरोना संशयितांचा मृत्यू मृत्यू झालेल्यांमध्ये एक महिला आणि दोन पुरुष यांचा समावेश आहे. या तिघांचे वय साठ वर्षाच्या पुढे असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. मंगळवारी रात्री कळव्याच्या विविध ठिकाणावरून हे तिघेही महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल झाले होते. यातील तिघांनाही श्वसनाचा त्रास होता, एकाला अर्धांगवायूचा त्रास आणि कोरोनाची काही लक्षण आढळून आले होते. दरम्यान, उपचारासाठी दाखल केल्यानंतर अवघ्या काही तासातच त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे, कळवेकरांसाठी ही चिंतेची बाब आहे.