ठाणे- वसई-दिवा मार्गावर असलेल्या खारबाव रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलाची दुरुस्ती सुरू असताना रेल्वेच्या उच्च दाब वाहिनीचा संपर्क आला. त्यामुळे तीन मोठे स्फोट झाले. यावेळी पुलाच्या वरच्या भागात ११ मजूर काम करीत होते. परंतु, सुदैवाने मजूरांना कोणतीही हानी झाली नाही. दरम्यान, या अक्षम्य घटनेची रेल्वे प्रशासनाने चौकशी करून दोषी ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी केली आहे.
खारबाव रेल्वे स्थानकात पूल दुरुस्तीदरम्यान अपघात; ११ मजुरांचे प्राण वाचले
खारबांव रेल्वे स्टेशनवरील लोखंडी पादचारी पुलाच्या दुरुस्तीदरम्यान तीन मोठे स्फोट झाले. यावेळी पुलाच्या वरच्या भागात ११ मजूर काम करीत होते. परंतु, सुदैवाने त्यांना कोणतीही हानी झाली नाही. दरम्यान, या अक्षम्य घटनेची रेल्वे प्रशासनाने चौकशी करून दोषी ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी केली आहे.
वसई-दिवा रेल्वे मार्गावरील खारबाव रेल्वे स्थानक येथून शेकडो प्रवासी दैनंदिन प्रवास करतात. या स्थानकावर ३० वर्षांपूर्वी उभारण्यात आलेला पादचारी पूल कमकुवत झाल्याने त्याची दुरुस्ती रेल्वे प्रशासनाने हाती घेतली आहे. त्या दुरुस्तीचा ठेका एका मुंबईतील खासगी ठेकेदाराला देण्यात आला. मात्र, या ठेकेदाराने १५ दिवस उलटूनही दुरुस्तीच्या कामात प्रगती केलेली नाही. त्यामुळे रेल्वे स्थानकावरील ट्रेनमध्ये बसण्यासाठी अथवा उतरणाऱ्या प्रवाशांना बाहेर पडण्यासाठी रेल्वेरूळ ओलांडूनच प्रवास करावा लागत आहे.
यादरम्यान जलदगतीने धावणाऱ्या मालगाडी अथवा एक्सप्रेसची धडक लागून मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पादचारी पुलाची दुरुस्ती लवकरात लवकर करावी तसेच पुलाच्या दुरुस्ती दरम्यान झालेल्या विद्युत स्फोटांची चौकशी करावी आणि ठेकेदारावर रेल्वेप्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी विशाल पाटील यांनी केली आहे.