ठाणे :ठाणे जिल्ह्यातील गेल्या आठवडाभरापासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यातच शहापूर तालुक्यातील दोन घरांवर बुधवारी रात्रीच्या सुमारास वीज कोसळून 26 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमींमध्ये एका सहा महिन्याच्या बाळाचाही समावेश आहे.
घरावर वीज कोसळून 26 जण जखमी; ठाण्याच्या शहापूरमधील घटना - ठाणे शहापूर वीज कोसळली
शहापूर तालुक्यातील शिरोळे ग्रामपंचायत हद्दीत फणस पाडा येथील दोन घरांवर बुधवारी रात्रीच्या सुमारास वीज कोसळून 26 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमींमध्ये एका सहा महिन्याच्या बाळाचाही समावेश आहे.
शहापूर तालुक्यातील फणसपाडा या आदिवासी पाड्यात थोराड कुटुंब राहते. काल सायंकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू होता. त्यातच थोराड यांच्या घरावर अचानक वीज कोसळली. यावेळी सर्व कुटुंबीय घरातच होते. या दुर्घटनेत थोराड कुटुंबासह शेजारी राहणाऱ्या पारधी कुटुंबातील सदस्यही जखमी झाले. दोन्ही कुटुंबातील एकूण 26 जण जखमी झाले आहेत.
यासोबतच वीज कोसळल्यामुळे घराचेही नुकसान झाले आहे. दरम्यान, सर्व जखमींवर शहापूर उपजिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच शहापूर प्रशासन घटनास्थळी रवाना झाले आहे.