ठाणे :ठाण्यात 2 एप्रिल रोजी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना ठाण्यातील शिवसेना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाली. रोशनी शिंदे यांनी दाखल केलेला गुन्हा हा पोलिसांनी नोंदवला नाही. रोशनी शिंदे यांच्यावरच ठाण्यातील दोन पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर या विरोधात ठाण्यामध्ये एक भव्य मोर्चा देखील काढण्यात आला.
कार्यकर्त्यांना मारहाण :काँग्रेसचे पदाधिकारी गिरीश कोळी यांना देखील शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी कोपरीमध्ये मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. सोशल मीडियावर चैत्र नवरात्र उत्सव संदर्भात पोस्ट टाकल्याप्रकरणी गिरीश कोळी यांना मारहाण केली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात केलेल्या आंदोलन प्रकरणी परांजपे याच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर ठाण्यातील तब्बल अकरा पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच वागळे येथील किसन नगरमध्ये ठाकरे गटाचा कार्यक्रम असताना शिंदे गटाच्या शाखेसमोरून ठाकरे गटाचे कार्यकर्ते जात असताना एक मोठा वाद झाला, त्यावेळेस पुन्हा एकदा दोन्ही गटांमध्ये मोठा वाद झाल्याचे दिसून आले होते. यावेळी संजय घाडीगावकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.