ठाणे : महिलांवरील अत्याचार, लैगिंक छळ, छेडछाड, महिलांविषयक गुन्हांना आळा घालण्यासाठी २०१६ साली राज्य शासनाच्या गृह विभागाने निर्भया पथकाची स्थापना केली. मात्र याच निर्भया पथकातील २३ वर्षीय महिला पोलीस कर्मचारी बेपत्ता झाल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कल्याण पश्चिम भागातील बाजरपेठ पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याप्रकरणी तक्रार दाखल केली असून, पोलीस त्या महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या शोधात एक पथक रवाना केले आहे.
निर्भय पथकात कार्यरत: पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता महिला पोलीस कर्मचारी कल्याण पश्चिम भागातील आधारवाडी परिसरात असलेल्या एका हायप्रोफाईल सोसायटीत कुटूंबासह राहते. ही महिला पोलीस कर्मचारी २०१९ सालापासून पोलीस दलात कार्यरत असून बेपत्ता होण्यापूर्वी ही महिला कर्मचारी नवी मुंबई पोलीस आयुक्तालया अंतर्गत असलेल्या एका पोलीस ठाण्यात निर्भय पथकात कार्यरत आहे. मात्र ही महिला पोलीस गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असल्याचे समोर आले आहे.
तीन दिवसांपासून कामावर गैरहजर : बेपत्ता महिला पोलीस कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून कामावर देखील गैरहजर असल्याचे समोर आले. त्यातच १५ ऑगस्ट निमित्तच्या कार्यक्रमाला देखील ही महिला पोलीस कर्मचारी गैरहजर होती. याच दरम्यान पोलिसांकडे आणखीन एक महिती समोर आली आहे. नवी मुंबईतील एका पोलिस ठाण्यातील एक पोलिस कर्मचारीही तीन दिवसांपासून कामावर गैरहजर असल्याची माहिती शोध घेणाऱ्या पथकला मिळाल्याने, बेपत्ता महिला पोलीस आणि कामावर गैरहजर असलेला पोलीस कर्मचारी यांच्यात प्रेमसंबंध असल्याची चर्चा पोलीस दलात होत असल्याचे दिसून येत आहे.