ठाणे : जिल्ह्यातील सर्वांत मोठी इराणी वस्ती कल्याण-कसारा रेल्वे मार्गावरील आंबिवली रेल्वे स्थानकाला लागूनच आहे. या वस्तीतून आतापर्यंत शेकडो इराणी गुन्हेगारांना पोलिसांनी विविध गुन्ह्यात अटक केली आहे. मात्र तरीही इराणी वस्तीत आजही गुन्हेगारांचा वावर असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात दुचाकी चोरी, धूमस्टाईलने सोनसाखळी, मोबाईल चोरणे आणि घरफोडी करण्यात पटाईत असलेल्या इराणी गँगच्या म्होरक्यांसह त्याच्या साथीदारांनी चोऱ्यांचा सपाटा लावला होता. त्यातच मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोपर रोड नांदीवली पूर्व येथे राहणारे शरद पुंडलीक कडुकर हे ३ जून रोजी सकाळी ७ वाजल्याच्या सुमारास भोपर कमाणी जवळी पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी पाठीमागून येऊन त्यांच्या हातातील महागडा मोबाईल जबरीने हिसकावून पळ काढला.
पोलीस पथकाला यश:या घटनेनंतर मानपाडा पोलीस ठाण्यात कडुकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या आणि गुन्ह्यांतील आरोपींचा शोध सुरू झाला. गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वनवे आणि सुनिल तारमळे यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून त्यांनी पथकासह कल्याण पश्चिम भागातील शहाड परिसरात सापळा रचला होता. त्यावेळी एक इसम दुचाकी घेण्यासाठी शहाड रेल्वे स्टेशन परिसरात आला. पोलीस पथकाला त्याच्यावर संशय आल्याने त्याच्यावर झडप घालून जागीच पकडले. त्यानंतर त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने पोलीस पथकाला गुन्ह्यांची कबुली दिली.