ठाणे- भिवंडी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये एका अपक्ष उमेदवाराकडे 'ना राजकीय ज्ञान आहे, ना आर्थिक पाठबळ आणि ना मनुष्यबळ. तरीही एक, दोन नव्हे तर चक्क २० हजारावर मतदान त्यांच्या पारड्यात पडले. आता त्यांना पडलेल्या मतांची चर्चा मतदारसंघात रंगली आहे. नितेश जाधव, असे अपक्ष उमेदवाराचे नाव असून तो अवघ्या २६ वर्षाचा आहे.
भिवंडी मतदारसंघाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मतदान झाल्यानंतर अनेक तर्क वितर्कांना उधाण आले होते. यामध्ये केवळ भाजपचे कपील पाटील, काँग्रेसचे सुरेश टावरे, बहुजन वंचित आघाडीचे डॉ. अरूण सावंत यांच्यातच लढत होण्याची शक्यता वर्तविली जात होती. परंतु, कल्याण तालुक्यातील फळेगावातील तरूण अपक्ष उमेदवार नितेश जाधव यांच्याकडे बड्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कानाडोळा केला होता. मात्र, मतमोजणीला सुरूवात झाली आणि अखेरचा निकाल हाती आल्यावर जाधव यांच्या मतांचा आकडा बघून सगळ्यांनाच धक्का बसला.
या निवडणुकीत नितेश जाधव यांना २० हजार ६९७ मते मिळाली. विशेष म्हणजे जाधव यांना दोन ते चार हजार मते पडतील अशी चर्चा सत्तेत असणारे व विरोधी पक्ष नेत्यांच्या वर्तुळात रंगत होत्या. मात्र, जाधव यांनी त्यांचा तर्क फेल ठरवत तब्बल २० हजार ६९७ मते मिळवत आपली ताकद दाखवून दिली. मतमोजणीच्या दिवशी भाजपचे कपील पाटील यांना ५ लाख २३ हजार ५८३ मतदान झाले. काँग्रेसचे सुरेश टावरे यांना ३ लाख ६७ हजार २५४ तर वंचित बहुजन अघाडीचे अरूण सावंत यांना ५१ हजार ४४५ मते मिळाली. या तिघापाठोपाठ अपक्ष नितेश जाधव यांना २० हजार ६९७ इतकी मते पडली तर नोटाला १६ हजार ३३७ मतदान झाले.