ठाणे - भिवंडी शहरातील धामणकर नाका परिसरात असलेल्या पटेल कंपाउंड येथील तीन माजली जिलानी इमारत कोसळल्याची दुर्घटना सोमवारी (दि. 21 सप्टें.) पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली होती . या दुर्घटनेत 38 जणांचा बळी गेला असून 25 जण जखमी झाल्याचे अधिकृत आकडेवारी महापालिका प्रशासनाने जाहीर केली आहे. मात्र, या दुर्घटनेत 20 चिमुरड्यांचा नाहक बळी गेल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे काही मृतांच्या नाव व आडनावावरून मृतांच्या आकडेवारीत बुधवारी (दि. 23 सप्टें.) सायंकाळी उशिरापर्यंत तफावत येत होती. बुधवारी सायंकाळी 41 मृतांची माहिती बचावकार्यासह महापालिका प्रशासनाकडून मिळत होती. मात्र, पोलीस प्रशासनाने मृतदेहांचा पंचनामा व इतर बाबी तपासल्यानंतर या दुर्घटनेत आतापर्यंत 38 जण मृत तर 25 जण जखमी झाल्याची माहिती दिली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे या दुर्घटनेत दिड ते पंधरा वर्ष वयोगटातील एकूण 20 चिमुरड्यांचा नाहक बळी गेला आहे. कुणाचे एक, कुणाचे दोन तर कुणाची तीन तीन मुले या दुर्घटनेत मृत्युमुखी पडली आहेत . आपल्या चिमुरड्यांचे मृतदेह पाहून नातेवाईक हंबरडा फोडत होते.फातिमा बब्बू सिराज शेख (वय 2 वर्षे), फुजेफा जुबेर कुरेशी (वय 5 वर्षे), आक्सा मोहम्मद आबिद अंसारी (वय 14 वर्षे), मोहम्मद दानिश आदिल अंसारी (वय 11 वर्ष), फायजा जुबेर कुरेशी (वय 5 वर्ष), आयशा कुरेशी (वय 7 वर्षे), फातमा जुबेर कुरेशी (वय 8 वर्षे), अफसाना अंसारी (वय15 वर्षे), असद शाहिद खान (वय अडीच वर्षे), निदा आरिफ शेख (वय 8 वर्षे), शबनम मोहम्मद अली शेख (वय12 वर्षे), हसनैन आरिफ शेख (वय 3 वर्षे), आरीफा मुर्तुजा खान (वय 3 वर्षे), जैद जाबीर अली शेख (वय 5 वर्षे), जुनैद जबीरअली शेख (वय दिड वर्ष), मरियम शब्बीर कुरेशी (वय 12 वर्ष), फलकबानो मो.मुर्तुजा खान (वय 5 वर्षे), फराह मो. मुर्तुजा खान (वय 6 वर्षे), शबाना जाबीर अली शेख (वय 3 वर्षे), रिया खान (वय 3 वर्षे) अशी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या चिमुरड्यांची नावे आहेत.