ठाणे : पहिल्या घटनेत भरधाव ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने झालेल्या अपघातात कल्याण डोंबिवलीतील एका कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना दुर्गाडी किल्ल्यावरून पत्रीपूल जाणाऱ्या गोवींदवाडी बायपास मार्गावरील फानूस ढाब्यासमोर घडली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करून ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रुपेश महादू गायकवाड (वय ,३४ रा. आधारवाडी, कल्याण) असे भीषण अपघातात जागीच ठार झालेल्या पालिकेच्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर या दोन्ही अपघात प्रकरणी दोन्ही चालकांना अटक करण्यात आली आहे.
डोंबिवली विभागात सफाई कर्मचारी:पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत रुपेश हा कल्याण पश्चिम भागातील आधारवाडी भागात असलेल्या मातोश्री रमाबाई आंबेडकर नगरमध्ये कुटूंबासह राहत होता. तो महापालिकेच्या डोंबिवली विभागात सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होता. त्यातच आज सकाळी नेहमीप्रमाणे मृत रुपेश हा आपल्या दुचाकीवरून कामाच्या ठिकाणी डोंबिवलीकडे दुर्गाडी किल्ल्यावरून पत्रीपूल जाणाऱ्या गोवींदवाडी बायपास मार्गाने जात होता. त्याच सुमाराला पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रक खाली दुचाकीसह तो पडल्याने, त्याच्या डोक्यावरून ट्रकचे चाक जाऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. तर घटनास्थळावरून ट्रक चालक पत्रीपूलच्या दिशेने ट्रकसह पळून गेला. या अपघाताची माहिती वाहतूक पोलिसांना मिळताच पोलिसांनी, ट्रक चालकाचा पाठलाग करत त्याला कल्याण पूर्वेतील सूचक नाका येथून ट्रकसह ताब्यात घेतले.
ट्रक चालकास केले अटक: घटनेची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळताच पथक घटनास्थळी दाखल झाले. रुपेशचा मृत्यूदेह शवविच्छदेनासाठी पालिकेच्या बाई रूखमणी रुग्णालयात पाठवला आहे. ट्रक चालक शोभनाथ तिवारी (रा. मुंबई मुलूंड ) याच्यावर भादंवि कलम ३०४ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांनी दिली आहे. विशेष म्हणजे गोवींदवाडी बायपास हा मृत्यूचा सापळा बनला आहे. आतापर्यत या मार्गावर १०० हुन अधिक लहान मोठे अपघात झाल्याची नोंद असून या अपघातात ५० च्या जवळपास नागरिकांचा अपघात बळी गेले आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने या गंभीर बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन अपघातास आळा घालायची गरज असल्याचे मत परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत.
टेम्पो आणि दुचाकीचा अपघात: दुसरी घटना भिवंडी शहरातील अंजुर फाटा परिसरातील स्पेक्ट्रम रुग्णालयासमोर आयशर टेम्पो आणि दुचाकीमध्ये अपघात झाला. यात दुचाकीस्वार पतीचा टेम्पोच्या चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली. अपघातग्रस्त पत्नीच्या फिर्यादीवरून नारपोली पोलीस ठाण्यात टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यास पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे.