ठाणे - भिवंडी शहरालगतच्या कारीवलीतील तलावापुढे एका यंत्रमाग कारखान्यात मेहता म्हणून काम करणाऱ्या कामगाराचा दोन दिवसापूर्वी अज्ञात मारेकऱ्याने पाठीमागून धारदार शस्त्राने भोसकून खून केल्याची खळबळजनक घटना घडली होती. विशेष म्हणजे केवळ ३ हजार ५०० रुपये लुटण्याच्या उद्देशाने आरोपी त्रिकुटाने खून केल्याचे उघडकीस आले असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींच्या ४८ तासातच मुसक्या आवळल्या आहे. अजित स्वयंकांत पटेल (वय, ४७ रा.बालाजी नगर, कारीवली) असे धारदार शस्त्राने भोसकून खून झालेल्या यंत्रमाग कामगाराचे नाव आहे. तर, आसिफ इम्तियाज अन्सारी (वय २३, रा. रामनगर भिवंडी ) मोहम्मद अफजल मोहम्मद अस्लम मन्सुरी (वय, २४ रा. फातमानगर भिवंडी) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहे. तर, त्यांचा साथीदार सलमान फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.
पॉवरलूम कामगाराच्या खुनाचा उलगडा; सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ४८ तासात २ अटकेत, १ फरार - bhiwandi crime branch
अजित हा दोन सहकारी कामगारांसोबत भिवंडीतील भंडारी कंपाऊंड येथील यंत्रमाग कारखान्यातील लाईट बंद करण्यासाठी पहाटे चारच्या सुमारास जात होता. दरम्यान कारीवली तलावाच्या पुढे दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात मारेकऱ्यांनी अतिच्या पाठीत धारदार शस्त्र खुपसले. ते शस्त्र थेट हृदयात वर्मी लागल्याने अजितचा जागीच मृत्यू झाला. तर, मृतकासोबत असलेले त्याचे २ सहकारी कामगार पळून गेले होते. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून एक फरार आहे.
प्राप्त माहितीनुसार १८ एप्रिल रोजी मृतक अजित हा दोन सहकारी कामगारांसोबत भिवंडीतील भंडारी कंपाऊंड येथील यंत्रमाग कारखान्यातील लाईट बंद करण्यासाठी पहाटे चारच्या सुमारास जात होता. कारीवली तलावमार्गे हे तिघेही पायी जात असतानाच तलावाच्या पुढे आले असता पाठीमागून दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात मारेकऱ्यांनी त्याच्या पाठीत धारदार शस्त्र खुपसले. दरम्यान, ते शस्त्र थेट हृदयात वर्मी लागल्याने अजितचा जागीच मृत्यू झाला. तर, मृतकासोबत असलेले त्याचे २ सहकारी कामगार पळून गेले होते.
या घटनेची माहिती मिळताच भोईवाडा पोलिसांनी घटनस्थळी दाखल होऊन पंचानामा करत मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी रवाना केला. तर याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. यानंतर, भोईवाडा पोलीस व भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास सुरू करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले होते. दरम्यान भिवंडी गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाटील यांना खबऱ्यामार्फत घटनेच्या दिवशी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारे तिन्ही आरोपी एका दुचाकीवरून फिरत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे आरोपी आसिफ आणि मोहम्मद अफजल यांना चौकशीसाठी गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. यावेळी दोघांनी लुटमारीच्या उद्देशाने हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. तर त्यांचा सलमान नावाचा साथीदार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. अटक करण्यात आरोपींकडून पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही जप्त केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक नरेश पवार (क्राईम) हे करत आहेत.