नवी मुंबई - पनवेल महानगरपालिका हद्दीत आज चक्क १९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर, १६ नवे रुग्ण सापडले आहेत. अधिकाधिक संख्येने रुग्ण बरे होण्याकडे कल असणे ही सकारात्मक बाब असल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.
पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी (ता. २०) १६ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच, १९ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे, अशी माहिती नवे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली आहे.
सुधाकर देशमुख, आयुक्त पनवेल महानगरपालिका या रुग्णांमध्ये कामोठ्यातील ८, कळंबोलीतील ४, नवीन पनवेलमधील ३, तर तळोजा येथील एका रुग्णाचा समावेश आहे. आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण ३०५ कोरोनाबाधित रुग्णांपैकी १५१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर, १२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाच्या १४२ ॲक्टिव्ह केसेस असल्याची माहिती सुधाकर देशमुख यांनी दिली आहे. याआधीचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याप्रमाणेच कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.