ठाणे : ठाण्यात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. यात 10 महिलांसह 18 बांगलादेशी नागरिकांचा समावेश असल्याची प्राथमीक माहिती समोर आली होती. मात्र या कारवाईत दहा महिला आणि आठ पुरुषांना अटक करण्यात आली आहे नवी मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 1 आणि 2 मार्चच्या मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यात बेकायदेशीरपणे वास्तव्य करत असल्याचे आढळून आल्याने त्यांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
लग्नाच्या वाढदिवसासाठी : काही बांगलादेशी नागरिक त्यांच्यापैकी एकाच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र येणार आहेत. नवी मुंबईतील घणसोली परिसरातील एका इमारतीत ते सर्व जमणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावर कारवाई करत नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी रात्री या परिसरात छापा टाकला. रबाळे पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी त्याबाबतची माहिती दिली आहे.
दहा महिला आणि आठ पुरुष ताब्यात :या कारवाईदरम्यान दहा महिला आणि आठ पुरुषांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस तपासादरम्यान अनेक गोष्टींचा उलगडा झाला आहे. यात ते गेल्या एक वर्षापासून विना वैध व्हिसा आणि पासपोर्ट शिवाय या परिसरात राहत होते हे समोर आले आहे. फॉरेनर्स अॅक्ट 1946 आणि पासपोर्ट नियम 1950 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या तपास सुरू आहे, असे नवी मुंबई पोलिसांनी सांगितले.